ब्रोकन हार्ट सिंड्रोम आहे गंभीर आजार, जाऊ शकतो जीव...वैज्ञानिकांनी सांगितली कारणे By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:48 PM 2021-06-21T18:48:24+5:30 2021-06-21T19:26:34+5:30
तुम्हाला हृदयाचे तुटणे म्हणजे काय ते माहित असेल. अनेकांच्या मते प्रेमभंग होणे म्हणजे हृदयाचे तुटणे होय. पण हृदय खरोखरंच तुटू शकते हे तुम्हाला माहित आहे का? असे प्रत्यक्षात होते आणि या आजाराला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असे म्हणतात. या आजारामुळे जीवही जाऊ शकतो. मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नीचा याच आजारामुळे मृत्यू झाला. ब्रोकन हार्ट सिंड्रोम या लक्षणास ताणाने निर्माण झालेली ‘कार्डिओमायोपॅथी’ किंवा ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी’ असे म्हटले जाते. या सिंड्रोममध्ये हार्ट अॅटॅकप्रमाणे लक्षणे दिसतात.
ब्रिटिश वैज्ञानिकांच्या मते या रोगाने जीव जाऊ शकतो. जर तुम्ही भरपूर तणावात असाल तर ब्रोकन हार्ट सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते. यात अनेकदा श्वास फुलणे, छातीत दुखणे आदी समस्या होऊ शकतात.
महिलांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम हे लक्षण आढळण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा जास्त दिसते. महिलांमध्ये भावनिक ताण प्रचंड वाढल्याने हृदयाच्या स्नायूंच्या कामात तीव्र अडथळे येतात.
युकेमध्ये दरवर्षी या रोगाचे २५०० रुग्ण आढळतात. त्यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते. यात मेनोपॉजनंतर आलेल्या समस्या जास्त कारणीभूत ठरतात.
ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनचा संशोधन रिपोर्ट कार्डियोवैस्क्युलरच्या जनरलमध्या छापण्यात आली आहे. यामध्ये तणाव ब्रोकन सिंड्रोम होण्यात महत्वाची भूमिका निभावतो. अचानक व्यक्तीचे जाणे, आर्थिक संकट आदी कारणे यामागे असू शकतात.
उच्च रक्तदाबही ब्रोकन सिंड्रोम होण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो. उच्च रक्तदाबाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. यासोबतच स्ट्रोक, हृदयाचे काम बंद पडणे आणि मूत्रपिंडाचे आजार अशा समस्या यामुळे येतात.
स्थूलता हे देखील ब्रोकन हार्ट सिंड्रोमला कारणीभूत ठरते. या सोबतच जास्त वजनामुळे हृदयाशी संबधित स्ट्रोक, कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता वाढते.
अनेकदा असे दिसते की, ब्रोकन हार्ट सिंड्रोम होँण्याआधी प्रकृती ठणठणीत असते.
आरोग्यकारक जीवनशैली म्हणजे हृदयासाठी पोषक असा आहार, नियमित शारीरिक व्यायाम, वजनावरील नियंत्रण आणि धूम्रपान न करणे या गोष्टींनी हा आजार टाळता येऊ शकतो.
या समस्येने ग्रस्त असलेले बहुतेक रूग्ण वेगाने आणि पूर्ण बरे झाले आहेत. या समस्येवर सध्या सखोल संशोधन सुरू आहे.