Corona Good News: दोन वर्षांनी येणार आनंदाची बातमी? कोरोना महामारी संपल्याची होऊ शकते घोषणा; डब्ल्यूएचओची तज्ज्ञांशी चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:17 AM 2022-03-14T09:17:25+5:30 2022-03-14T09:22:08+5:30
WHO may declare corona pandemic end: कोरोना नियंत्रणात असून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीच्या अंताची घोषणा करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी अवघ्या जगाला मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या कोरोना महामारीने लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. जगभरात लसीकरणही बऱ्यापैकी झाले आहे. यामुळे आता कोरोना नियंत्रणात असून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीच्या अंताची घोषणा करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे. यामुळे लवकरच कोरोना संपल्याची घोषणा केली जाऊ शकते.
कोरोना व्हायरसच्या संकटात जगाची दोन वर्षे संपली. यानंतर कोरोना महामारी अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर केले तर याचा जगावर कोणता परिणाम होईल, यावर देखील चर्चा केली जात आहे. डब्ल्यूएचओने कोरोना महामारी संपल्याचे लगेचच घोषित करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.
जगातील अधिकांश देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. हाँगकाँगमध्ये मृत्यूचा दर वाढला आहे. चीनमध्ये दोन वर्षांत पहिल्यांदाच या आठवड्यात १००० हून अधिक रुग्ण सापडले आहेत.
यामुळे कोणते असे संकेत असतील ज्यावरून कोरोना महामारी संपल्याचे म्हणता येईल यावर चर्चा केली जात आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोविड-19 वरील आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणीबाणी समिती महामारी संपल्याचे घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांचे परीक्षण करत आहे.
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 3,116 नवे रुग्ण सापडले आहेत. जे गेल्या 676 दिवसांपेक्षा कमी आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 0.09 टक्के आहे, तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.71 टक्क्यांवर गेले आहे. चीनमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे.
चीनमध्ये रविवारी दोन वर्षांनी पहिल्यांदाच 3300 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे अनेक शहरांत लॉकडाऊन लावण्यात आला असून लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. शांघाईमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत
हाँगकाँगमध्ये देखील परिस्थिती बिघडू लागली आहे. या शहरात 27,647 नवे रुग्ण सापडले आहेत. तर ८७ लोकांना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इथे 3,729 लोकांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएतनाममध्ये कोरोनाची त्सुनामी आली आहे, आठवड्याला तिथे १४ लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.