Corona Vaccination : लवकरच मिळेल नाकावाटे लस!, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:00 AM2021-08-19T10:00:26+5:302021-08-19T10:09:22+5:30

Corona Vaccination: नाकावाटे दिली जाणारी बीबीव्ही१५४ ही भारताची पहिली लस आहे.

कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला देशात आता वेग आला आहे. ५० कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. पाच लसी दिमतीला आहेत. त्यातच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचेही आगमन होण्याच्या मार्गावर आहे.

नाकावाटे दिली जाणारी बीबीव्ही१५४ ही भारताची पहिली लस आहे. भारत बायोटेक आणि सेंट लुसियाचे वॉशिंग्टन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली जात आहे.

जानेवारी महिन्यात या लसीच्या पहिल्या चाचणीला सुरुवात झाली. त्यात १८ ते ६० या वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. लसीच्या दुसऱ्या नैदानिक चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे.

इतर लसी दंडातील रक्तपेशीत इंजेक्ट केल्या जातात. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे दोन-तीन थेंब नाकात टाकले जातात. इंजेक्शन देण्याची गरज नसते.

नोझल स्प्रेसारखीच ही लस आहे.तसाही कोरोना नाकावाटेच शरीरात पसरतो. त्यामुळे नाकावाटे दिली जाणारी लसही कोरोनाला आरंभस्थानीच अटकाव करते. ही सिंगल डोस लस आहे.

भारत बायोटेकने घेतलेल्या या लसीच्या नैदानिक चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकावर लसीचे दुष्परिणाम जाणवले नाहीत.

नाकात प्रतिकारशक्ती वाढीस लागल्यानंतर कोरोना विषाणू फुफ्फुसापर्यंत जाऊ शकणार नाही. आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरजच भासणार नाही.

उत्पादन सहजसोपे असल्याने लस वाया जाण्याचा धोकाही कमी. लस कुठेही नेता येणे शक्य. साठवणुकीचा फारसा प्रश्न निर्माण होणार नाही.