coronavirus: कोरोनावरील लसीसाठी घेतला जाणार पाच लाख शार्कचा बळी?

By बाळकृष्ण परब | Published: September 28, 2020 10:58 AM2020-09-28T10:58:17+5:302020-09-28T11:07:35+5:30

कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी तब्बल पाच लाख शार्क मारले जातील, अशी भीती वाइल्ड लाइफ एक्स्पर्टसनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. त्यामुळे कोरोनाची ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लस विकसित करण्याच्यादृष्टीने जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी तब्बल पाच लाख शार्क मारले जातील, अशी भीती वाइल्ड लाइफ एक्स्पर्टसनी व्यक्त केली आहे.

यामागील कारण म्हणजे शार्कच्या यकृतामध्ये एक विशिष्ट्य प्रकारचे तेल असते. ज्याचा वापर लस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणून केला जातो.

कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या अनेक लसींमधील साहित्यामध्ये शार्कच्या यकृताचे तेल असल्याचा ऊल्लेख आहे. लसीचा प्रभाव वाढवण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील शार्क अलाइज या संस्थेने केलेल्या दाव्यानुसार कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीसाठी सुमारे ५ लाख शार्क मारले जातील.

शार्कच्या यकृतामध्ये स्क्वोलीन (Squalene) नावाचा पदार्थ असतो. हे एक प्रकारचे नैसर्गिक तेल असते. याचा वापर लसीमध्ये केला जातो. जगभरात सध्या कोरोनावरील ३० लसी विकसित केल्या जात आहेत. ज्यांची मानवी चाचणी सुरू आहे.

शार्क अलाइजच्या म्हणण्यानुसार जर जगभरातील लोकांना कोरोनाच्या लसीची आवश्यकता भासली तर त्यासाठी तब्बल अडीच लाख शार्कना मारावे लागेल. सध्या चाचण्यांदरम्यान कोरोनावरील लसीचे दोन डोस स्वयंसेवकांना दिले जात आहे.

शार्क अलाइजच्या संस्थापक स्टिफनी ब्रेंडिल यांनी सांगितले की कुठल्याही वस्तूसाठी वन्यप्राण्यांची हत्या करणे योग्य ठरणार नाही. विशेषकरून ज्या जीवाची प्रजननक्षमता कमी आहे. मी कोरोनावरील लस विकसित करण्याची प्रक्रिया संथ करण्याची माझी इच्छा नाही. मात्र जनावरांमधून न मिळवलेल्या स्क्वोलीन (Squalene) ची सुद्धा सोबतच चाचणी व्हावी, अशी माझी इच्छा आहे.