Coronavirus: ‘डेल्टा, ओमायक्रॉन’नंतर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट; यूकेत सापडला पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:55 PM2022-02-19T12:55:01+5:302022-02-19T13:00:29+5:30

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता पसरली होती. त्यातून हळूहळू सावरत असताना कोरोनाचा नवा व्हेरिएंट धडकला आहे.

गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरवलं आहे. त्यात कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे वैज्ञानिकही चिंतेत आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेव लसीकरण पर्याय आहे. त्याचसोबत उपचारासाठी औषधांचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाचे एकापाठोपाठ एक व्हेरिएंट येत असून लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. डेल्टा, ओमायक्रॉन नंतर आता नव्या व्हेरिएंटमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन पासून बनलेल्या हायब्रिड स्ट्रेननं डेल्टाक्रॉन(Deltacron) निर्माण झाला आहे.

ब्रिटनमध्ये डेल्टाक्रॉनचे काही रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेत चिंता पसरली आहे. सध्या या व्हेरिएंटचे रुग्ण कमी असल्याने टेन्शन घेण्याची गरज नाही असं यूकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजेन्सीनं म्हटलं आहे. मात्र यावर तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, UKHSA तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आणि गंभीर आहे याबाबत सध्या काहीही माहिती नाही. त्याचे लक्षण काय? कोरोना लस या नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे? यावर प्रोफेसर पॉल हंटर यांनी भाष्य केले आहे.

पॉल हंटर यांनी डेली मेलला सांगितले की, या नव्या व्हेरिएंटमुळे जास्त धोका नसावा कारण यूकेमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन(Omicron) विरोधात लोकांच्या शरीरात आधीच एँन्टीबॉडीज उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या तरी नव्या व्हेरिएंटची चिंता नाही.

तज्ज्ञांच्या मते, हा एक सुपर सुपर म्यूटेंट व्हायरस आहे. ज्याला वैज्ञानिकांनी BA.1 + B.1.617.2 नाव दिलंय. डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या एकत्र येण्यानं हायब्रीड स्ट्रेन तयार झाला आहे. ज्याला सर्वात आधी साइप्रसच्या रिसर्चर्सनं मागील महिन्यात शोधलं होतं.

त्यावेळी वैज्ञानिकांनी लॅबमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा हवाला दिला होता. परंतु आता ब्रिटनमध्ये डेल्टाक्रॉनचे (Deltracron) रुग्ण समोर आले आहेत. यावर जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही व्यक्तीला कोविडच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण होऊ शकते.

याची अनेक उदाहरणं आहेत. कोरोना महामारीच्या काळात काहीजण इन्फ्लूएंजा आणि कोविड १९ या दोन्ही आजारानं संक्रमित होते. WHO च्या मारिया वान केरखोव यांनी मागील महिन्यात ट्विट करत डेल्टाक्रॉनच्या शब्दाचा वापर करु नका असं म्हटलं होतं.

मागील महिन्यात सायप्रस विद्यापीठातील जैववैज्ञानिक प्राध्यापिका लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी डेल्टाच्या जीनोममध्ये ओमायक्रॉनचे अंश सापडल्याने त्याला डेल्टाक्रॉन असं म्हटलं होतं. रिपोर्टनुसार, संशोधकांच्या या टीमला या व्हेरिएंटचे २५ रुग्ण आढळले होते.

ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र, हा ‘व्हेरिएंट’ पूर्वीच्या ‘डेल्टा’पेक्षा कमी घातक असल्यामुळे दुसऱ्या लाटेइतका हाहाकार माजला नाही. शिवाय, लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्याने ओमायक्रॉनमुळे होऊ शकणारी मोठी प्राणहानी टळली.