CoronaVirus: अल्कोहोलचा वास घेताच कोरोना मरणार, रुग्ण बरा होणार; वैज्ञानिकाचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:35 AM2021-07-06T09:35:57+5:302021-07-06T09:41:27+5:30

Alcohol vapor treatment on corona: तुम्हाला कोणी अल्कोहोलचा वास घेऊन कोरोना संक्रमणापासून बचाव होईल किंवा बरे व्हाल म्हटले तर विश्वास बसणार नाही. परंतू अमेरिकेत एक असा प्रयोग सुरु आहे.

कोरोना व्हायरस आल्यानंतर अनेक प्रकारचे उपाय सुचविण्यात येत आहेत. यासाठी अनेक वैज्ञानिक कामही करत आहेत. अल्कोहोलपासून बनविलेले सॅनिटायझर कोरोना व्हायरसला बाहेरच मारत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात आहे. (Alcohol vapor treatment on corona patient, showing good result.)

परंतू जर तुम्हाला कोणी अल्कोहोलचा वास घेऊन कोरोना संक्रमणापासून बचाव होईल किंवा बरे व्हाल म्हटले तर विश्वास बसणार नाही. परंतू अमेरिकेत एक असा प्रयोग सुरु आहे, ज्याद्वारे अल्कोहोलचा वास घेतल्याने कोरोनापासून मुक्ती मिळणार आहे.

अमेरिकेत अल्कोहोलची वाफ (Alcohol Vapour) किंवा अल्कोहोलचा वास घेणे हा कोरोनावरील रामबाण उपाय करण्यासाठी वैज्ञानिक कामाला लागले आहेत. आजवर या प्रयोगाचे तीन टप्पे झाले आहेत. या मधील निकालांमुळे वैज्ञानिकांचीही आशा वाढली आहे. कारण आजवरच्या परिक्षणात रुग्णांना काही मिनिटांतच श्वास घेण्यास खूप सोपे गेले आहे.

अल्कोहोलची वाफ घेण्याचा उपाय व्हायरसचा खात्मा करण्यासाठी खूप जुना आहे. मात्र, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले तर अल्कोहोलची वाफ किंवा वास घेणे आणि त्यात यश मिळणे हे पहिल्यांदाच समोर आले आहे.

जर हा उपाय सार्वजनिक वापरासाठी मंजूर झाला तर मेडिकल क्रांती होणार आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या सेंटर फॉर ड्रग इव्हॅल्यूएशन अँड रिसर्चमध्ये हा शोध पुढे गेला आहे. दिल्लीतील वैज्ञानिक शक्ति शर्मा यांनी याबाबतचे पत्र अमेरिकन एफडीएमध्ये पाठविले आहे.

या शर्मा यांना एफडीएकडून उत्तर आले आहे. या तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरसवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच अल्कोहोलचा वास किंवा वाफ घेऊन कोरोनावर मात केली जाऊ शकते. (टीप: हे अल्कोहोल वैद्यकीय प्रमाणित असते. बाजारात मिळणाऱ्या अल्कोहोलद्वारे हा प्रयोग करू नये. जिवीतास हाणी होऊ शकते.)

अमेरिकेचे एडवेंटिस्ट हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी ब्रिटनचे रसायन वैज्ञानिक डॉ. इस्लाम यांच्या नेतृत्वात अल्कोहोल व्हेपरवर प्रयोग केला आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल फार्मास्यूटीजमध्ये देखील हा अहवाल छापून आला आहे.

सामान्य तापमानात सुर्यप्रकाशापासून दूर ठेवलेल्या ६५ टक्के अल्कोहोलची मात्रा असलेले रसायन ऑक्सिजनच्या मदतीने 3.6 मिलीग्राम प्रतिमिनिट असे श्वासावाटे देण्यात आले. रोज ४५ मिनिटे हा उपचार करण्यात गंभीर रुग्णांवर करण्यात आला.

कोरोना संक्रमणामध्ये अधिकतर लोकांना आधी वरील श्वासनलिकेवर परिणाम जाणवतो. यावर तातडीने नियंत्रण केले गेले नाही तर खालच्या श्वासनलिकेवर परिणाम जाणवतो. कोरोनाचे तीन असे व्हेरिअंट आहेत, जे थेट खालच्या श्वासनलिकेवर हल्ला करतात. यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

अल्कोहोलमुळे कोरोनाच्या बाहेरील प्रोटिन आवरणावर परिणाम होतो. याच प्रोटिनद्वारे कोरोना रुग्णांच्या पेशीवर हल्ला करतो. ऑक्सिजनसोबत अल्कोहोलचे कण दिल्याने ते थेट फुफ्फसामध्ये गेले. यामुळे तिथे असलेल्या कोरोनाचा खात्मा होऊ लागल्याचे या संशोधनात दिसून आले आहे.