coronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली
By बाळकृष्ण परब | Updated: September 26, 2020 12:47 IST2020-09-26T12:34:39+5:302020-09-26T12:47:17+5:30
कोरोनावर विकसित केलेली लस लवकरात लवकर सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या शर्यतीत अखेर चीनने बाजी मारल्याचे वृत्त आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे जगातील अनेक देश हैराण झालेले आहेत. काही देशांमध्ये तर कोरोनाची दुसरी लाटही आता येऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनावरील लस कधी उपलब्ध होईल याकडे विविध देशांची सरकारे, आरोग्य यंत्रणा आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
या अशा परिस्थितीत कोरोनावर विकसित केलेली लस लवकरात लवकर सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या शर्यतीत अखेर चीनने बाजी मारल्याचे वृत्त आहे. आपण विकसित केलेली लस चाचणी व्यक्तिरिक्त इतर मोजक्या लोकांनाही देण्याच्या निर्णयाला जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) पाठिंबा दिला आहे, असा दावा चीनने केला आहे.
यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने प्रसारित केले असून, चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, चीन चाचणी व्यतिरिक्त इतर विविध समुहातील व्यक्तींनाही कोरोनावरील लस जुलै महिन्यापासूनच देत होता. मात्र अनेक तज्ज्ञांनी चीनच्या या निर्णयावर टीका केली होती.
दरम्यान, चीन सरकारने जुलै महिन्यामध्येच कोरोनावरील लसीच्या आपातकालीन वापराची परवानगी दिली होती. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी झेंग झोंगवेई यांच्या म्हणण्यानुसार जून महिन्यामध्येच चीनने जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या लसीची माहिती पाठवली होती.
चीनने आपातकालीन मान्यतेच्या अंतर्गत आवश्यक सेवांशी संबंधित लाखो कर्मचारी आणि हाय रिस्क ग्रुपमधील अनेक लोकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात केली होती. मात्र चीनच्या लसीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल समोर आलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचे असिस्टंट डायरेक्टर जनरल डॉ. मरिअनजेला सिमाओ यांचे म्हणणे आहे की, विविध देशांना आपल्या वैद्यकीय उत्पादनांच्या आपातकालीन वापराची परवानगी देण्याचा अधिकार आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवरील लसीचा आपातकालीन परिस्थितीतील वापराला दिलेली मान्यता हा एक तातत्पुरता उपाय आहे. दीर्घकाळापर्यंत लसीच्या वापरासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याची गरज असते.
चीनने कोरोनावरील आपल्या तीन लसींना आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. यामध्ये सीएनबीजी, सिनोव्हॅक या लसींचा समावेश आहे. तर कॅनसिनो कंपनीच्या लसीला लष्करी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
चीनचे नॅशनल हेल्थ अधिकारी झेंग झोंगवेई यांचे म्हणणे आहे की, २०२० च्या अखेरीपर्यंत चीनकडे एका वर्षात ६१ कोटी लसींचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. तर २०२१ पर्यंत ही क्षमता एक अब्ज लसी विकसित करण्यापर्यंत पोहोचेल, असे सांगितले.