Coronavirus: भारतात कोरोना संक्रमण बनलंय अत्यंत धोकादायक; एअरबॉर्न झालाय का व्हायरस? तज्ज्ञ सांगतात... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:09 PM 2021-04-27T21:09:52+5:30 2021-04-27T21:15:09+5:30
Coronavirus: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उभं करण्यात येत आहे. दिवसाला लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजला आहे. दिवसाला साडेतीन लाख कोरोनाबाधित आढळून येत आहेत. ऑक्सिजनअभावी लोकांचे मृत्यू होत आहेत. हे भयावह चित्र देशाच्या अनेक भागात पाहायला मिळत आहे. याच दरम्यान तज्ज्ञांकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली जाताच लोकं घाबरून जात आहेत. अनेकदा खोकला आणि हालचालीमुळेही ऑक्सिजन पातळी खालीवर होत असते. पल्स, ऑक्सीमीटर व्यवस्थित न लावल्यानेही ऑक्सिजन पातळी कमी दाखवते. त्यामुळे ऑक्सिजन तपासताना बारकाईने सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं एम्सच्या कोविड विभागातील प्रमुख डॉक्टर राजेश मल्होत्रा यांनी सांगितले.
डॉ. मल्होत्रा म्हणाले की, शरीरात ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर पालथं झोपणंही दिलासादायक असतं. जर तुमच्या शरीरात ऑक्सिजन कमी असल्याचं जाणवत नसेल आणि तरीही ऑक्सीमीटरमध्ये पातळी ९० च्या खाली दाखवते तर कदाचित तुम्ही ऑक्सीमीटर व्यवस्थित लावला नाही असं असू शकतं. जर श्वास घेण्यास अडचण येत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा
आंतरराष्ट्रीय मेडिसिन तज्ज्ञ डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले की,सध्या RTPCR टेस्ट करण्याऐवजी आपण रुग्णाला त्याच्या लक्षणानुसार उपचार देणे चांगले आहे. जर कोणत्या रुग्णामध्ये लक्षण दिसत असेल तर त्याला आयसोलेट करा. घरात कोणीही पॉझिटिव्ह आलं असेल तर घाबरू नका. शरीरातील चढउताराबाबत डॉक्टरांसोबत चर्चा करा. त्यानंतर तुम्हाला उपचारांची गरज आहे की, हॉस्पिटलाइजेशनची ते सांगतील.
तर हवेतून कोरोना संक्रमण होतंय का यावर बोलताना फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. अशोक सेठ म्हणाले की, हवेतून कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होतोय का यावर आम्ही चिंतेत आहोत. हा व्हायरस ड्रॉपलेटच्या माध्यमातून प्रवास करतो. खोकताना, बोलताना ड्रॉपलेट बाहेर येतात. परंतु ड्रॉपलेट असल्याने ते जास्त दूर जाऊ शकत नाही. काही अंतरावरच ते जमिनीवर पडतात. त्यामुळे लोकांनी ६ फूट अंतर पाळणं गरजेचे आहे.
त्याचसोबत मागील २-३ आठवड्यापासून यावर रिसर्च सुरू आहे. हॉटेलच्या एका रुममधून दुसऱ्या रुममध्ये संक्रमित झाल्याचंही समोर आलं आहे की हा एअरबॉर्न डिसीज आहे. परंतु बाहेरच्या हवेत तो आहे हा अर्थ नाही. हा व्हायरस ड्रॉपलेटच्या माध्यमातून हवेत काही काळ राहू शकतो. काही तास तो हवेत प्रवास करू शकतो. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं आणि सोशल डिस्टेंसिंग पाळायला हवं असंही सेठ म्हणाले.
दरम्यान डबल मास्क लेयर्स कोणत्याही व्यक्तीला या व्हायरसपासून वाचवू शकतो. कपड्याचा मास्क ५०-६० टक्के आपला बचाव करते. मास्क असा असायला हवा जो चेहरा आणि नाक पूर्ण झाकू शकतो कारण ड्रॉपलेट कुठूनही आत जाऊ नये. सध्याचा कोरोना वेरिएंट खूप संक्रमण करणारा आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका असंही डॉक्टर सेठ यांनी सांगितले.
मेदांता येथील डॉक्टर अरविंद कुमार सांगतात की, मागील वर्षीच्या तुलनेत सध्या कोरोना व्हायरस धोकादायक आहे. पहिल्यांदा लोकांना ५ दिवस ताप राहत होता त्यानंतर श्वास घेण्यास अडचण येत होती. लहान मुलांवर जास्त परिणाम नव्हता. परंतु आता परिस्थिती उलट आहे. घरातील एकाला कोरोना झाल्यास इतरही संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे. म्हणजे या व्हायरसचं संक्रमण कित्येक पटीने वाढलं आहे.
इंग्लंडच्या ब्रिटिश वेरिएंटचा डेटा आला आहे त्यात सांगितले आहे की, हा व्हायरस फक्त जास्त संक्रमण करत नाही तर मृत्यूची संख्याही अधिक आहे. अचानक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. १८ ते ४९ वयोगटातील लोकं मोठ्या संख्येने कोरोनाचा शिकार होत आहेत. मागील वेळी ज्यांना कोरोना झाला ते पुन्हा संक्रमित झाले आहेत. लसीकरणाचे २ डोस घेऊनही संक्रमित होत आहेत.
मागील वर्षापासून कमी जागेत जास्त गर्दीमुळे कोरोना ट्रान्समिशन झालं आहे. बर्थ डे पार्टी, लग्न समारंभ इ. विशेषत: ज्या जागी वेंटिलेशन कमी होतं आणि एअरकंडिशनर हॉल होते तिथे संक्रमण होण्याचे प्रमाण जास्त होतं असं डॉ. अरविंद म्हणाले.
जर कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ४ लाखांपर्यंत पोहचली तर स्थिती आणखी बिकट होणार आहे. हॉस्पिटलमध्ये आधीच रुग्णसंख्या जास्त आहे. रुग्णांना आयसीयू बेड आणि ऑक्सिजन मिळणं कठीण झालं आहे. अशातच रुग्णसंख्या वाढली तर खूप मोठं संकट उभं राहू शकतं.