धोका वाढला! कोरोनामुळे उद्भवू शकतो कर्णबधिरपणा, तज्ज्ञांच्या दाव्याने वाढवली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:32 PM 2020-10-14T15:32:53+5:30 2020-10-14T15:45:42+5:30
CoronaVirus News & Latest Updates : डॉक्टरांना आता कोरोनामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो याचे पुरावेही आढळले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसबाबत अभ्यासातून एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. ब्रिटिश तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक अशी समस्या उद्भवल्यास लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे चवन न समजणं, वास न येणं यांशिवाय शरीराच्या वेगवगेळ्या भागांना नुकसान पोहोचू शकते.
डॉक्टरांना आता कोरोनामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो याचे पुरावेही आढळले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार ४५ वर्षांच्या कोरोना आणि अस्थमाने संक्रमित असलेल्या रुग्णाला आयसीयूत व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं होतं. एंटी व्हायरल ड्रग रेमडिसीविर आणि नसांमध्येही स्टेरॉईड देण्यात आलं होतं.
ICU तून बाहेर आल्यानंतर या व्यक्तीच्या कानाला विशिष्ट संवेदना जाणवत होत्या. त्यानंतर हळूहळू श्रवणक्षमता कमी झाली. या घटनेनंतर डॉक्टरांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, या रुग्णांच्या कानात आधीपासून कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे कानांवर परिणाम होईल असे कोणतेही औषध देण्यात आले नव्हते.
पुढील तपासणीदरम्यान निदर्शनास आलं की, या रुग्णाला कोणताही फ्लू किंवा एच आयव्ही नव्हता म्हणून कानांची ऐकण्याची क्षमता कमी होण्याची कोणतेही ऑटोइम्यून समस्या दिसून आली नाही. याशिवाय रुग्णाला याआधी कधीही ही समस्या जाणवली नव्हती. चाचणीदरम्यान दिसून आलं की रुग्णाला 'सेंसोरिन्यूरल हियरिंग लॉस' ची समस्या उद्भवली होती. या स्थितीत आवाज येण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कांनाचा भाग क्षतिग्रस्त झाले होते. स्टेरॉयड्सने यावर उपचार केले जाऊ शकतात.
ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच अशी घटना समोर आली आहे. या अभ्यासाच्या सह लेखिका स्टेफनिया कोऊम्पा यांनी सांगितले, आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे कशाप्रकारे कानांवर परिणाम होऊन ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हे स्पष्ट झालेलं नाही. पण ही समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्टेफनिया कोऊम्पा यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस कानांच्या पेशींमध्ये शिरून त्याची कार्यक्षमता कमी करत असावा. त्यामुळे शरीरातील सायटोकाइन्स नावाचे इन्फ्लेमेटरी केमिकल मोठ्या प्रमाणात रिलिज होते. त्यामुळे ही समस्या वाढत जाते. इन्फ्लेमेटरी केमिकल्स या साइटोकिन्सचे तयार होण्यापासून रोखण्यासाठी स्टेरॉईड फायदेशीर ठरतात.
संशोधकांच्या टीमने दिलेल्या माहितीनमुसार आयसीयूमध्ये रुग्णाला कानांशी संबंधित समस्यांबाबत विचारणा केली जायला हवी. डॉ. कॉउम्पा यांनी सांगितले की, एका कानाची ऐकण्याची क्षमता कमी झाल्यास व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधील ऑडियोलॉजीचे प्राध्यापक केविन मुनरो या संशोधनाचा भाग नव्हते. तरीही त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांवर सर्वे केला होता.
. या सर्वेमध्ये दिसून आलं की, १२१ पैकी १६ रुग्ण असे होते ज्यांना दोन महिन्यांनंतर ऐकण्याची क्षमता कमी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता. आता मुनरो यांच्या टीमद्वारे या समस्येमागचं कारण शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.