पॉझिटिव्ह बातमी! भारतात 'या' ८ कोरोनावरील लस तयार होण्याच्या मार्गावर; वाचा कधी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 08:25 PM2020-12-08T20:25:47+5:302020-12-08T20:49:32+5:30

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशातील आठ कंपन्या लस विकसित करत आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

गेल्या मार्चनंतर बहुतेक देशांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लॉकडाउन, सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून संसर्ग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ब्रिटनमध्ये फायझर या कोरोनावरील लसीला गेल्या आठवड्यात मंजुरी मिळल्यानंतर आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. येथील 90 वर्षीय महिलेला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत कोरोनावरील लस भारतात कधी मिळणार आणि तिची चाचणी कुठपर्यंत पोहचली हे महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया, कोणती लस कोणत्या स्टेज आहे...

१) कोविशिल्ड लस चिंपांझीच्या एडेनोव्हायरसवर आधारित आहे, जी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सहकार्याने विकसित केली आहे. कंपनीची ही लस चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यात आहे. कंपनीने भारतात आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे.

२) कोव्हॅक्सिन कोरोना व्हायरच्या इनएक्टिवेटेड व्हायरसवर आधारित आहे. हैदराबादमध्ये स्थित ‘भारत बायोटेक’ ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने तयार करत आहे. कोव्हॅक्सिनची चाचणी तिसर्‍या टप्प्यात आहे. आपत्कालीन वापरासाठीही कंपनीने अर्ज केला आहे.

३) जायकोव्ह-डी डीएनए आधारित कोरोना व्हायरस लस आहे, जी अहमदाबादमधील कॅडिला हेल्थकेअर, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसोबत तयार करण्यात येत आहे. ही लस चाचण्यांच्या तिसऱ्या फेरीत आहे.

४) रशियाची स्पुटनिक-व्ही लस ह्यूमन एडेनोव्हायरसवर आधारित एक लस आहे. रशियाच्या गमालेया नॅशनल सेंटरच्या सहकार्याने हैदराबाद येथील रेड्डीज लॅब भारतात विकसित करत आहे. लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील आठवड्यापासून तिसरा टप्पा सुरू होईल.

५) NVX-CoV2373 लस प्रोटीन सब-युनिटवर आधारित आहे आणि नोटावॅक्सच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली आहे. त्याच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीची तयारी भारतात सुरू आहे.

६) Recombinant Protien Antigen आधारित कोरोना व्हायरसची लस ही हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनी एमआयटी यूएसएच्या सहकार्याने तयार केली जात आहे. प्राण्यांवरील या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. ही लस त्याच्या मानवी चाचणीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात आहे, जी सुरू झाली आहे.

७) HGCO 19 लस mRNA आधारित लस आहे, जी पुण्यातील Genova अमेरिकन कंपनीने HDT सोबत विकसित केली आहे. प्राण्यांवरील या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. मानवी क्लिनिकल चाचण्यांचे पहिले आणि दुसरे टप्पे अद्याप बाकी आहेत.

८) Inactivated rabies vector platform नावाची कोरोनावरील लस हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनेशनल कंपनी अमेरिकेच्या थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने विकसित करत आहे. ही लस प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये आहे.