Corona Virus : सावधान! कोरोनातून बरं होऊन 2 वर्षानंतर फुफ्फुसात समस्या; रिसर्चमध्ये टेन्शन वाढवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:53 PM2023-02-16T12:53:47+5:302023-02-16T13:18:44+5:30

Corona Virus : जगभरातील अनेक देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. असं असताना रिसर्चमधून टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनामधून बरे होऊन दोन वर्षानंतरही फुफ्फुस पूर्णपणे बरं झालेलं नाही, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

'रेडिओलॉजी' नावाच्या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जगभरात 60 कोटीहून अधिक लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, परंतु तरीही त्यांच्या काही अवयवांना, विशेषत: फुफ्फुसात दीर्घकाळ संसर्ग होऊ शकतो.

चीनच्या वुहान येथे असलेल्या हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मेडिकल कॉलेजच्या किंग यी आणि हेशुई शी यांनीहा अभ्यास केला आहे. या अभ्यासात कोविडमधून बरे झालेल्या 144 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 79 पुरुष आणि 65 महिला होत्या, ज्यांचे सरासरी वय 60 वर्षे होते.

हे असे रुग्ण होते जे 15 जानेवारी ते 10 मार्च 2020 दरम्यान कोविडने बरे झाले होते. या लोकांचे 6 महिने, 12 महिने आणि दोन वर्षांचे तीन सीटी स्कॅन झाले. सीटी स्कॅनमध्ये असे दिसून आले की कोविडमधून बरे झाल्यानंतर दोन वर्षानंतरही त्यांच्या फुफ्फुसात अनेक समस्या होत्या.

फुफ्फुसात फायब्रोसिस, थिकनिंग, हनीकॉम्बिंग, सिस्टिक चेंज अशा अनेक समस्या दिसल्या आहेत. अभ्यासात असे आढळून आले की 6 महिन्यांनंतर 54 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसात समस्या निर्माण झाल्या होत्या.

दोन वर्षानंतरही 39 टक्के रुग्णांची फुफ्फुसे पूर्णपणे बरी झालेली नाहीत. तसेच 61 टक्के म्हणजेच 88 रुग्णांची फुफ्फुसे ठीक होती. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या दीर्घकाळ राहिल्या.

6 महिन्यांनंतर 30 टक्के रुग्णांना ही समस्या होती, तर दोन वर्षानंतर अशा रुग्णांची संख्या 22 टक्क्यांवर आली. अभ्यासानुसार, दोन वर्षानंतरही अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

दोन वर्षांनंतरही 29 टक्के रुग्णांना पल्मोनरी डिफ्यूजनच्या तक्रारी असल्याचे समोर आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनानंतरही रुग्णांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. सध्या कोरोनाने चीनमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा भारतावर वाईट परिणाम झाला. शास्त्रज्ञ कोरोनाबाबत नवनवीन संशोधन करत आहेत आणि नवनवीन सातत्याने गोष्टी समोर येत आहेत.

एका नवीन संशोधनानुसार, काही रुग्ण जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना पोस्ट कोविडमध्ये देखील समस्या येऊ शकतात. कोरोना व्हायरसने शरीरावर खोलवर परिणाम केला आहे, ज्यापासून ते लवकर बरे होणे शक्य नाही.

विशेष म्हणजे पोस्ट कोविडमुळे अडचणीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की कोविड-19 रुग्णांमध्ये संसर्ग झाल्यानंतर किमान 18 महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका वाढतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत.

याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये साथीच्या आजारातून बरे होऊनही लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांसाठी हा अहवाल चिंताजनक आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा व्हायरसचा प्रभाव सुमारे अठरा महिने शरीरावर पडतो. दरम्यान, संधी मिळताच तो शरीरावर हल्ला करतो, त्यात जीवही जाऊ शकतो. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नल कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे 1 लाख 60 हजार लोकांवर केलेल्या अभ्यासानंतर हे आढळून आले आहे.