दिलासादायक! अखेर 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस येणार, हजारो लोकांवर चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:02 PM2020-05-19T12:02:57+5:302020-05-19T12:14:12+5:30

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध विकसीत झालं नसून सर्वच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत. तर काही प्रयोग यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यासाठी काही संशोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना व्हायरसची लस शोधण्याबाबत अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनीने दावा केला आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनी फायजरने एक पाऊल पुढे टाकलं आहे. फायजर कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या वॅक्सिनचे क्लिनिकल ट्रायल सप्टेंबरमध्ये हजार लोकांवर करण्यात येणार आहे.

फायजर कंपनीचे सीईओ आणि चेअरमन अलबर्ट बॉर्ला यांनी दावा केला आहे की, विचार केल्याप्रमाणे या लसीबाबत सकारात्मक परिणाम झाल्यास ऑक्टोबरमध्ये या वॅक्सिनचे लाखो नमुने तयार करण्यात येणार आहेत.

कंपनीने जी लस तयार केली आहे.त्या लसीला BNT162 असं नाव देण्यात आलं आहे. ५ मार्चला जर्मनीमध्ये या लसीच्या पहिल्या डोसची माणसांवर चाचणी करण्यात आली होती.

फायजर कंपनी सध्या चार वेगवेगळ्या लसी विकसित करण्यासाठी काम करत आहे. कंपनीतील संशोधकांच्यामते जून किंवा जुलैमध्ये कोणती लस सगळ्यात जास्त परिणामकारक आणि प्रभावी आहे हे सिद्ध होईल. यासाठी माहिती गोळा करून विश्लेषण करण्याचे काम संशोधक करत आहेत.

जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात १२० लसींवर ट्रायल सुरु आहे. अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. की, वॅक्सिन तयार करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो.

Read in English