अरे व्वा! स्वॅबऐवजी गुळण्या केलेल्या पाण्यानं कोरोनाची चाचणी होणार; खर्चही वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:47 PM2020-08-21T17:47:04+5:302020-08-21T18:05:28+5:30

कोरोनाने जगभरासह भारतातही कहर केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस आणि औषधं शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी वेळोवेळी चाचण्या करणं गरजेचं आहे.

दरम्यान भारतातील इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी एक सोपा पर्याय दिला आहे. या सोप्या पद्धतींचा वापर केल्यानं सँपल कलेक्शनमध्ये फारसा वेळ लागणार नाही. शिवाय रिजल्टही चांगला दिसून येईल.

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार गुळण्या केलेल्या पाण्यातील नमुन्यांना वापर करून कोरोनाची तपासणी करता येऊ शकते. नाकातील स्पॅब लाळेचे सॅपल यापेक्षा गुळण्या केलेलं पाणी पाणी वापरल्यास चाचणी प्रकिया सोपी होईल. या पद्धतीचे नमुने गोळा करण्याचं कामही सोपं होणार आहे.

विशेष म्हणजे रिपोर्ट लवकर मिळवता येऊ शकतो. यामुळे प्रशिक्षित आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाला नमुने गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त इतर कामांकडे वळता येऊ शकतं. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून या नवीन तपासणीच्या पद्धतीचा शोध लावण्यात आला आहे.

या संबंधी रिपोर्ट हा इंडीयन जर्नल ऑफ मेडिकलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ICMR च्या अभ्यासानुसार गुळण्या केलेल्या पाण्याच्या नमुन्यामुळे तपासणी केल्यानं टेस्टिंगसाठी लागणारा खर्च कमी करता येऊ शकतो. तुलनेनं जास्त सुरक्षेचीही आवश्यकता भासणार नाही.

याशिवाय नाकातून स्वॅब घ्यावा लागणार नाही.

हा अभ्यास पूर्ण केलेल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नाकातून स्वॅब काढणं कठीण काम असतं. अनेकदा यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता असते.

गुळण्या केलेल्या पाण्याची चाचणी करणं ही सोपी पद्धत ठरू शकते.