CoronaVirus News : जपानमध्ये अनोखे डिव्हाईस लाँच, कोरोना नष्ट करण्याचा कंपनीचा दावा

By ravalnath.patil | Published: September 22, 2020 04:30 PM2020-09-22T16:30:08+5:302020-09-22T16:53:56+5:30

जपानमधील एका कंपनीने अल्ट्राव्हायोलेट (Ultraviolet) लॅम्प लाँच केला आहे. या लॅम्पचा उपयोग कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी होत असल्याचा दावा कंपनीने केला आहेत. तसेच, याचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होणार होत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.

पारंपारिक अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा उपयोग केला जात नाही, कारण यामुळे त्वचेचा कर्करोग आणि डोळ्यांची समस्या उद्भवू शकते. परंतु नवीन लॅम्पमध्ये कर्करोग रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. अशाप्रकारचे हे जगातील पहिले उपकरण मानले जात आहे.

scmp.com च्या अहवालानुसार, जपानची कंपनी उशिओने नवीन यूव्ही लॅम्प लाँच केला आहे. पारंपारिक यूव्ही लॅम्प 254 नॅनोमीटर वेवलेंथच्या किरणांचे उत्सर्जन करतात, परंतु नवीन लॅम्प 222 नॅनोमीटरची यूव्ही किरणे बाहेर येतील.

ही यूव्ही किरणे मानवी शरिरासाठी हानिकारक नाहीत. या यूव्ही लॅम्पची किंमत सुमारे 2 लाख 10 हजार रुपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उशिओ ही जपानची प्रमुख लाइट इक्विपमेंट कंपनी आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या सहकार्याने कंपनीने नवीन लॅम्प तयार केले आहे.

या लॅम्पला Care 222 असे नाव दिले आहे. यूव्ही लॅम्पचा वापर बस, ट्रेन, लिफ्ट आणि ऑफिसेसमध्ये केला जाईल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

मेडिकल आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आधीपासून निर्जंतुकीकरणासाठी यूव्ही लाइटचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र, ज्याठिकाणी लोक उपस्थित आहेत, त्याठिकाणी धोक्यामुळे याचा वापर केला जात नाही.

कंपनीचा असा दावा आहे की, नवीन लॅम्पमधून 222 नॅनोमीटरची यूव्ही किरणे बाहेर येतात आणि ही त्वचेत प्रवेश करत नाहीत.

तसेच, यामुळे डोळ्यांनाही दुखापत होत नाही. ही यूव्ही किरणे 6 ते 7 मिनिटांत व्हायरस आणि बॅक्टेरियांना 99 टक्क्यांपर्यंत नष्ट करण्यास सक्षम आहेत.

हिरोशिमा विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, 222 नॅनोमीटरच्या यूव्ही किरणांनी कोरोना व्हायरस नष्ट केल्याची पुष्टी देण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

सध्या हे डिव्हाईस फक्त वैद्यकीय संस्थांसाठी उपलब्ध आहे. मात्र, जानेवारीपर्यंत हे मोठ्या प्रमाणात ऑर्डरसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी कंपनीने तोशिबा कंपनीसोबत करार केला आहे.