धक्कादायक! कोरोनामुळे मेंदूच्या पेशी होत आहेत नष्ट, सीटी स्कॅनमध्ये दिसले काळे डाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:19 PM2020-05-18T13:19:31+5:302020-05-18T13:48:26+5:30

जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोना व्हायरसबाबत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तीला मेंदूशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसंच बेशुद्धावस्थेत असताना बडबडण्याची लक्षणं दिसून येत आहेत. वैद्यकिय भाषेत या स्थितीला 'आईसीयू डिलेरियम' म्हणतात. त्यामुळे काही रुग्णांच्या मेंदूत काळे डाग पडलेले दिसून आले आहेत. यातून असं दिसून आलं की कोरोना व्हायरस मेंदूच्या पेशींना नष्ट करत आहेत.

अमेरकेतील हेनरी फोर्ड हेल्थ स्टिस्टिमच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ५८ वर्षीय कोरोना संक्रमित महिलेला ताप आणि सर्दी, खोकला यांसह भ्रम होणं, थकवा जाणवणं यासांरख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. डॉक्टरांनी सिटी स्कॅन केले, तेव्हा दिसून आलं की महिलेच्या मेंदूमध्ये काळ्या रंगाचे डाग आहे. पेशी पूर्णपणे मृत झाल्या होत्या.याचं कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण हे होतं.

याशिवाय रिपोर्टमध्ये दिसून आलं की डोक्यात गाठी आणि रक्तस्त्राव सुद्धा होत होता. त्यामुळे मेंदूशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरस संक्रमणामुळे एक्यूट नेक्रोटाइजिंग इंसेफलाइटिसची समस्या उद्भवत होती. ही समस्या फ्लू आणि कांजण्या असलेल्या रुग्णांमध्येही दिसून येत होती. कोरोनामुळे अशा केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत.

त्यासाठी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. कारण कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रक्तस्त्राव सुद्धा वाढत आहे. व्हायरसचा प्रसार झाल्यामुळे रुग्णांना मेंदूशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ. हलीम फादिल यांनी दिलेल्या माहितीनुसार काही रुग्णांना चालायला त्रास होतो आहे. तर डोकेदुखी, चिडचिड होणं, राग येणं, झोप न येणं याचा संबंध मेंदूशी असून यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.

टेक्सासच्या हेल्थ आरलिंग्टन मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. केविन कॉर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीयूमध्ये भर्ती होत असलेल्या सर्वाधिक रुग्णांना आयसीयू डिलेरियमची समस्या असते.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहे की, संक्रमण झाल्यामुळे लोकांची फुफ्फुसं काम करणं बंद झाली आहेत. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे तीव्र तापाची समस्या उद्भवत आहे.

त्यामुळे अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरित तपासणी करणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.