२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:37 PM2020-08-10T13:37:54+5:302020-08-10T13:53:37+5:30

कोरोनाच्या माहामाहामारीत जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील २१ पेक्षा जास्त देशातील लसींचे वैद्यकिय परिक्षण सुरू आहे. लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत सुरूवातीपासूनच रशिया पुढे आहे.

रिपोर्टनुसार २ दिवसात म्हणजेच १२ ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. रशियातील अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जगातील पहिली कोरोनाची लस असणार आहे.

रशियामध्ये कोरोनाची लस विकसित करण्याचं काम गमलेया रिसर्च इंस्टिट्यूटकडून केलं जाणार आहे. ही संस्था रशियाच्या आरोग्यमंत्रालयाच्या अंतर्गत आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइय मुराश्को यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीचे परिक्षण सफल झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाला सुरू केली जाणार आहे.

स्पेटनिक न्यूजने दिलेल्या माहितीनुसार गमलेया नॅशलन रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार एडेनो व्हायरसवर आधारीत ही लस तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ही लस पूर्णपणे सुरक्षित असून या लसीमुळे व्यक्तीच्या आरोग्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, चाचण्या केल्यानंतर स्वयंसेवकांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडून आले असून रोगप्रतिकारकशक्ती वाढली. यावरून दिसून आले की लसीच्या चाचणीचे योग्य दिशेने काम सुरू आहे.

अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले की, काही लोकांना लस दिल्यानंतर ताप आल्याचे दिसून आले. कारण लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा शरीराचं तापमान वाढतं. पण सामान्य पॅरासिटोमॉल किंवा इतर औषध घेऊन ताप सहज कमी होऊ शकतो.

लस तयार झाल्यानंतर लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारीवर्गाला प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल.

वरिष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवेतील कामगारांना लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणीदरम्यान या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये देशभरात लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान अमेरिका आणि ब्रिटन यांसारखे इतर अनेक देश रशियाच्या लसीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. रशियाने लसीच्या चाचण्यांचा साइंटिफिट डेटा न दिल्याचं अनेकांचे म्हणणे आहे.