CoronaVirus News : बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 03:56 PM2022-02-20T15:56:53+5:302022-02-20T16:28:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढा जिंकणाऱ्यांचे उर्वरित आयुष्य कसे असेल याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने आणि नवनवीन व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाशी लढा जिंकणाऱ्यांचे उर्वरित आयुष्य कसे असेल याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.

एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की जे लोक कोरोनापासून वाचले आहेत त्यांना नैराश्य, झोपेच्या समस्या आणि ड्रग्सचे सेवन होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेत झालेल्या या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोरोनाचा मानसिक आरोग्याच्या समस्यांशी थेट संबंध आहे.

'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संशोधकांनी दीड लाख लोकांचा अभ्यास केला. याच दरम्यान, त्यांना आढळून आले की कोरोनाची लागण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत लोक नैराश्यात जाण्याची किंवा झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असण्याची शक्यता 40 टक्के अधिक असते.

20 टक्के लोक ड्रग्सचा गैरवापर करतात. याव्यतिरिक्त, त्यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), आत्महत्येची विचारसरणी आणि पॅनीक हल्ल्यांचा धोका देखील या लोकांना खूप जास्त होता.

संशोधकांनी सांगितले की, संसर्ग जितका गंभीर असेल तितकी मानसिक आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. कोरोनाचा थेट मानसिक आरोग्याशी संबंध असल्याचे दिसून येते.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (बीएमजे) शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. मात्र, हे संशोधन केवळ निरीक्षणावर आधारित असून त्यामागील कारणाचा तपशीलवार उल्लेख नाही. Depression आणि Anxiety या आधीच लाँग कोविडशी संबंधित आहेत.

सेंट लुईस विद्यापीठातील संशोधकांनी अशा 150,000 निवृत्त लष्करी कर्मचार्‍यांवर संशोधन केले, ज्यांचे वय 60 च्या आसपास आहे आणि जे जानेवारी 2021 पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या लोकांवर वर्षभर नजर ठेवण्यात आली होती.

लोकांची तुलना 5.6 मिलियन लष्करी कर्मचार्‍यांशी केली गेली ज्यांना त्या कालावधीत संसर्ग झाला नव्हता. या वेळी, संशोधकांना आढळून आले की कोविडशी लढा जिंकलेल्या प्रत्येक 1000 लोकांमागे नैराश्याची सुमारे 15 अतिरिक्त प्रकरणे आहेत.

कोरोनाला बळी पडलेल्या लोकांमध्ये आत्महत्येसारखे विचारही येत असलेले दिसले, हा आकडा सामान्यपेक्षा 24 टक्के अधिक होता. नीट झोप न येण्यासारख्या समस्यांबाबतही त्यांनी सांगितले आहे.

इतकेच नाही तर या लोकांमध्ये दारू आणि ड्रग्जचा गैरवापर होण्याची शक्यताही इतरांपेक्षा जास्त दिसून आली. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुष्परिणामांबाबत यापूर्वीही अनेक रिसर्च झाले आहेत. कोरोनाग्रस्त व्यक्तीसाठी लठ्ठपणा जीवघेणा ठरू शकतो हे देखील समोर आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला असूण एकूण संख्या 423,809,825 वर पोहोचली आहे. तर 5,901,261 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील विविध रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 348,805,392 जण कोरोनातून बरे झाले आहेत.