CoronaVirus: रुग्णांमध्ये दिसतोय 'लॉन्ग कोविड', 6 महिन्यांपर्यंत राहतात लक्षणं; एम्सचे डॉ. नीरज निश्चल यांनी दिली महत्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:03 AM 2021-05-31T10:03:00+5:30 2021-05-31T10:13:45+5:30
केवळ गंभीर रुग्णांतच नाही, तर हलकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांतही ही समस्या दिसून आली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये बरेही झाले आहेत. रिकव्हरीच्या पाच आठवड्यांनंतर लॉन्ग कोविडमध्ये सर्वाधिक दिसून आलेले लक्षण म्हणजे थकवा, असेही डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितले. (Dr. Neeraj Nischal) कोरोना व्हायरसने आतापर्यंत अनेक रुपं बदलली आहेत. कोरोनामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता तर असेही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, ज्यांच्यात रिकव्हर झाल्यानंतरही दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. काही रुग्णांत ही लक्षणं काही आठवडे दिसतात, तर काही रुग्णांत 6 महिन्यांपर्यंतही दिसत आहेतात. अशा स्थितीला 'लॉन्ग कोविड' असे नाव देण्यात आले आहे. (CoronaVirus now long covid is being seen in patients symptoms can remain up to 6 months)
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एम्समधील कोविड एक्सपर्ट डॉ. नीरज निश्चल यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, केवळ भारतातच नाही, तर परदेशातही अनेक रुग्णांत रिकव्हरीच्या 5-6 महिन्यांनंतरही लक्षणं दिसून आली आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली, प्रकृती गंभीर झाली आणि रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, अशा अधिकांश रुग्णांत लॉन्ग कोविड पाहायला मिळाला आहे. देश आणि परदेशात 20 टक्के प्रकरणांत लॉन्ग कोविड आढळून आला आहे.
केवळ गंभीर रुग्णांतच नाही, तर हलकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांतही ही समस्या दिसून आली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये बरेही झाले आहेत. रिकव्हरीच्या पाच आठवड्यांनंतर लॉन्ग कोविडमध्ये सर्वाधिक दिसून आलेले लक्षण म्हणजे थकवा, असेही डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितले.
डॉ. नीरज निश्चल म्हणाले, पाच आठवड्यांनंतर कोरोनाच्या ज्या लक्षणांमुळे लोक त्रस्त आहेत, त्यांत थकवा येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे परदेशात लॉन्ग कोविडसंदर्भात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासत दिसून आले आहे. 11.8 टक्के लोकांत हे लक्षण रिकव्हरीनंतर अनेक दिवस दिसून आले.
निश्चल म्हणाले, दुसरे लक्षण कफ, हे लक्षण जवळपास 10.9 टक्के रुग्णांत दिसून आले. यानंतर 10.1 टक्के लोकांत डोकेदुखी, 6.4 टक्के लोकांत चव न येणे, 6.3 टक्के लोकांत सुगंध न येणे, 6.2 टक्के लोकांत गळ्यात दुखणे, 5.6 टक्के लोकांत श्वास घेण्यास त्रास, अशी लक्षणं काही महिन्यांनंतरही दिसत आहेत.
एम्समध्येही लॉन्ग कोविडच्या रुग्णांसंदर्भात एक डेटा तयार केला जात आहे. डॉ. निश्चल म्हणाले, कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषध घेऊ नका. यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.
कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर काय करावे...? 1. मेंटल हेल्थकडे लक्ष द्या. 2. किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक. 3. स्मोकिंग आणि अल्कोहल बुल्कुल बंद करा. 4. कॅफीनचे प्रमाण कमी करा. 5. आराम करा आणि धावपळ करू नका. 6. सकाळच्या वेळी व्यायाम करा.
चांगल्या रिकव्हरीसाठी आणि फिट होण्यासाठी हे घ्या... - दाळ, पनीर, फिश, अंडे, मीट, बिन्स. या सर्वांत प्रोटीन, व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणावर असतात.
मेंटल हेल्थमध्ये अशी करा सुधारणा - कोरोना अथवा महामारीत उदासिनता, स्ट्रेस, कंफ्यूजन, राग येणे सामान्य गोष्ट आहे. यापासून दूर राहण्यासाठी जवळच्या लोकांसोबत गप्पा मारा. कॉमेडी, व्हिडिओज, शो पाहू शकता.
अपल्या भावना दाबण्यासाठी स्मोकिंग, अल्कोहल अथवा इतर कुठल्याही ड्रगचा वापर करू नका.
नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करा. पॉझिटिव्ह गोष्टीच पहा आणि लोकांनाही पॉझिटिव्ह गोष्टींच सांगा.
जर अधिक स्ट्रेस अथवा मेंटल हेल्थशी संबंधित इतर काही गोष्टी जाणवत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.