CoronaVirus News : दिलासादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरांत सगळ्यात आधी दिली जाणार कोविड 19 ची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:32 AM2020-07-27T11:32:36+5:302020-07-27T11:48:49+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूंची लस कधी तयार होणार याबाबत भारतासह जगभरातील लोक प्रतिक्षेत आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचे उत्पादन भारतातील सीरम इंस्टिट्यूटद्वारे केले जाणार आहे. सीरम इंडीया इंस्टिट्यूट आणि अमेरिकेतील फार्मा कंपनी यांची भागिदारी आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी कोरोनाची लस विकसित करण्यासाठी एक्स्ट्राजेनका कंपनीची मदत करत आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसची लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू केले आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया पुण्यातील कंपनी आहे. सीरम इंडीया इंस्टिट्यूट आणि एक्स्ट्राजेनका यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २ ते ३ कोटी लसीचे डोस तयार होतील.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीचे नाव ChAdOx1 nCoV-19 आहे. भारतात या लसीला कोविडशील्ड (covid shield) असं नाव देण्यात आलं आहे.

ही लस अमेरिकेत तयार केली असून त्या ठिकाणच्या स्वयंसेवकांवर मानवी चाचणी करण्यात आली होती. परंतू भारतातील लोकांवर या लसीचा कसा परिणाम होतो. हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी स्थानिक लोकांवर परिक्षण करणं गरजेचं आहे. या चाचणीसाठी डीसीजीआयकडून परवागनी मागण्यात आली आहे.

भारतात कोरोनाची कोविडशील्ड ही लस तयार झाल्यानंतर देशातील मुंबई आणि पुण्यातील लोकांना सगळ्यात आधी दिली जाण्याची शक्यता आहे.

सीरम इंडिया इंस्टिट्यटचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे ऑगस्ट महिन्यात या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ४ ते ५ हजार लोकांना ही लस दिली जाणार आहे.

कारण मुंबई आणि पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असल्यामुळे सुरुवातीला या शहरातील लोकांना लस दिली जाणार आहे.

Read in English