कोरोनातून बरं व्हायला किती वेळ लागतो, टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा होतो का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:09 AM2020-04-15T11:09:02+5:302020-04-15T12:00:02+5:30

कोरोना व्हायरस पसरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाची लागण होत असलेल्यांची संख्या तसंच मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन होऊ शकतं का किंवा कोरोनातून पूर्णपणे प्रकृती बरी झालेल्या रुग्णाला लागण होऊ शकते का याबाबत सांगणार आहोत.

देशभरातून १० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. एक हजारापेक्षा जास्त लोकांना बरं करून घरी पाठवण्यात आलं आहे. पण कोरोनापासून पूर्णपणे बरं होणं तितकसं सोपं सुद्धा नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती टेस्टमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन होऊ शकतं.

कोरोना रुग्णांला बरं व्हायरला किती वेळ लागतो : कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेला व्यक्ती संक्रमणाच्या स्टेजवर अवलंबून असतो. साधारणपणे १४ ते २० दिवसांचा कालावधी लागू शकतो. काही केसेसमध्ये बरं व्हायला ३ ते ६ आठवड्यांचा वेळ लागू शकतो.

ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे, डोळ्यांची जळजळ, जुलाब, तोंडात कडवटपणा येणे, थकल्यासारखं वाटणे, अशक्तपणा ही कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची लक्षणं आहेत.

सुरूवातीला लक्षणं दिसल्यानंतर १४ दिवसांपर्यंत क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाची लक्षणं दिसणं बंद झाल्यानंतरही ७२ तास सावधानता बाळगून क्वारंटाईन राहावं लागतं.

त्यानंतर २ वेळा कोविड १९ च्या टेस्टमध्ये निगेटिव्ह येणं आवश्यक आहे. तसंच २४ तास आयसोलेशनमध्ये राहावं लागतं. त्या व्यक्तीला गर्दीच्या ठिकाणापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.

कोरोना पसरण्याची शक्यता कधीपर्यंत असते: सध्या अशी कोणतीही माहिती किंवा डेटा प्राप्त झालेला नाही. ज्याद्वारे इन्फेक्शन कधीपर्यंत पसरू शकतं हे निश्चित केलं जाईल.

मेटा अध्ययनातील रिपोर्टनुसार एका व्यक्तीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मलातून व्हायरसचे आरएनए दिसून आले. पण ते आरएनए सक्रिय होते की नाही. याचा शोध घेण्यात रिसर्चकर्त्यांना यश आलेलं नाही.

एक्सपर्ट्सच्यामते लक्षणं दिसायची थांबली की इन्फेक्शन पसरण्याचा धोका सुद्धा कमी होतो.