खुशखबर! रशियानं तयार केली कोरोनाची तिसरी प्रभावी लस, डिसेंबरपर्यंत मंजूरी मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:23 PM 2020-10-17T12:23:54+5:30 2020-10-17T12:39:53+5:30
CoronaVaccine News & Latest Updates : रशियाची तिसरी लस चुमाकोव सेंटर ऑफ रशियनं एकेडमी ऑफ सायंजेसमध्ये तयार करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार या लसीला डिसेंबर २०२० पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशिया खूप पुढे आहे. रिपोर्ट्नुसार रशियाने कोरोनाची तिसरी लस तयार केली आहे. रशियाने ऑगस्टमध्ये कोरोनाची स्पुटनिक व्ही ही पहिली लस लॉन्च केली होती. त्यानंतर एपिवॅककोरोनाही लस १४ ऑक्टोबरला लॉन्च केली असून आता रशियन शास्त्रज्ञांनी तिसरी कोरोनाची लस तयार केली आहे.
रशियाची तिसरी लस चुमाकोव सेंटर ऑफ रशियनं एकेडमी ऑफ सायंजेसमध्ये तयार करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार या लसीला डिसेंबर २०२० पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. या लसीला नोवोसिबिर्स्क, सेंट पीटर्सबर्ग आणि किरोवच्या मेडिकल फॅसिलिटी रिसर्च सेंटरमध्ये पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मंजूरी मिळाली आहे.
पहिल्या टप्प्यात ६ ऑक्टोबरला १५ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली होती. त्यानंतर या लसीचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. या लसीचे दुसऱ्या टप्प्यातील मानवी परिक्षण हे २८५ स्वयंसेवकांव र १९ ऑक्टोबरला केलं जाणार आहे. अंदाजे या लसीच्या सगळ्या चाचण्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतात.
रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी जाहीर केले होते की, देशात दुसर्या कोरोनावरीललस 'EpiVacCorona' मंजूर झाली आहे. सुरुवातीच्या चाचणीमध्ये चांगले परिणाम दिल्यानंतर लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पेप्टाइड-आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केली होती.
दुसर्या लसीची घोषणा करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले होते की, "आता आम्हाला पहिल्या आणि दुसर्या लसीचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. पेप्टाइड आधारित EpiVacCorona लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने तयार केली आहे आणि कोरोना रोखण्यासाठी या लसीचे दोन डोस दिले पाहिजेत."
जवळपास 100 स्वयंसेवकांवर ही लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत भाग घेतलेले स्वयंसेवक 18 ते 60 या वयोगटातील होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ही लस दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन आठवड्यांपूर्वी प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला आहे.
लसीच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आणि स्टडी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली आहे. EpiVacCorona लसीशी संबंधित स्टडीचे परिणाम अद्याप प्रसिद्ध केले नाहीत.
रशियाने आपल्या कोणत्याही लसीची मोठ्या प्रमाणावरील चाचणी सुरू केलेली नाही. रशियाची पहिली लस स्पुटनित व्ही ही एडीनोव्हायरस वेक्टरवर आधारित आहे. सध्या ही लस १३०० स्वयंसेवकांना दिली जात आहे.
. दरम्यान रशियाची कोरोनाची लस ही जगातील पहिली यशस्वीरित्या तयार झालेली कोरोना लस असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होती. लसीबाबत हा दावा केल्यानंतर भारतातील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियासोबत एक करार केला होता. पण भारत सरकारकडून आता रशियाच्या लसीच्या चाचण्यांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.