coronavirus: ...तर दर १६ सेकंदाला एक मृत अर्भक जन्माला येईल, WHO चा गंभीर इशारा

By बाळकृष्ण परब | Published: October 8, 2020 05:15 PM2020-10-08T17:15:56+5:302020-10-08T17:26:04+5:30

Coronavirus News : WHO आणि Unicef ने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाच्या साथीमुळे गर्भवती महिला आणि गर्भामधील अर्भकांसाठी धोका वाढणार असून, दरवर्षी जगभरात २० लाखांहून अधिक मृत अर्भकांचा जन्म होईल.

कोरोना विषाणूच्या जगभरात झालेल्या फैलावामुळे संपूर्ण जगासमोर मानवी आरोग्याबाबत गंभीर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे गर्भवती महिला आणि गर्भातील अर्भकांवर होणाऱ्या परिणामाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे.

WHO आणि Unicef ने हा इशारा दिला आहे. त्यानुसार कोरोनाच्या साथीमुळे गर्भवती महिला आणि गर्भामधील अर्भकांसाठी धोका वाढणार असून, दरवर्षी जगभरात २० लाखांहून अधिक मृत अर्भकांचा जन्म होईल.

कोरोनामुळे गर्भवती महिला आणि गर्भातील अर्भकांना असलेला धोका आधीच वाढला आहे. आता कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला तर दर १६ सेकंदाला एक या गतीने गर्भामधून मृत अर्भकांचा जन्म होईल आणि दरवर्षी एकूण २० लाख अर्भकांचा जन्म होईल, अशी भीती डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसे यापैकी बहुतांश मृत अर्भके विकसनशिल देशात जन्माला येतील, अशी शक्यताही या अहवालामधून वर्तवण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की,दरवर्षी सुमारे २० लाख अर्भके मृत जन्माला येतात. यापैकी बहुतांश ही विकसनशील देशांमधील असतात. गर्भधारणेच्या २८ आठवड्यानंतर मृत बालक जन्माला येणे किंवा प्रसुतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू झाल्यास त्याला स्टिलबर्थ असे म्हणतात.

याबाबत युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेनरिटा फोर यांनी सांगितले की, जगभरात दर १६ सेकंदाला कुठे ना कुठे एक आई स्टिलबर्थचा त्रास अनुभवेल. उत्तम देखभाल, प्रसवपूर्व चांगली देखभाल आणि सुरक्षित प्रसुतीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता यामाध्यमातून हे मृत्यू रोखता येतील.

दरम्यान, कोरोनामुळे या आकडेवारीत मोठी वाढ होऊ शकते, अशी भीती या अहवालामधून वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्य सुविधांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ११७ विकसनशील देशांत मिळून स्टिलबर्थ होऊ शकतात. स्टिलबर्थचे ४० टक्क्यांहून अधिक प्रकार हे प्रसुतीदरम्यानचे आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने असे प्रकार थांबवता येतील, असे डब्लूएचओेने सांगितले.

उप-सहारा वाळवंट आणि मध्य आशियामध्ये स्टिलबर्थच्या अर्ध्याहून अधिक घटना ह्या प्रसुतीदरम्यानच्या आहेत. तर युरोप, उत्तर अमेरिक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अशा सहा टक्के घटना घडतात. विकसित देशांमध्ये जातीय अल्पसंख्याक समुदायांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षणही डब्ल्यूएचओने नोंदवले आहे.

Read in English