coronavirus: कोरोनामुळे लोकांचे सरासरी आयुर्मान घटणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती By बाळकृष्ण परब | Published: September 20, 2020 10:16 AM 2020-09-20T10:16:24+5:30 2020-09-20T10:27:14+5:30
काही देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयग्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नियंत्रणात येत नसलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयग्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
कोरोनामुळे जगरभरातील लोकांचे सरासरी आयुर्मान मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची भीती जगभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, याबाबतच्या संशोधनाची माहिती पीएलओएस वन या नितकालिकामध्ये प्रकाशित झाली आहे.
कोरोनाच्या साथीने आतापर्यंत जगभरात तीन कोटींहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर ९.६१ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. त्यामधून कोरोना विषाणू मानवी जीवनावर कोणता परिणाम करणार याचा शोध घेतला जात असून, त्यामधून या विषाणूच्या मानवी आयुर्मानावर परिणाम होणार असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे माणसांच्या सरासरी आयुर्मानात घट होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
पीएलओएस वन नावाच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधानुसार कोरोनामुळे जगभरातील लोकांच्या जीवनमानात मोठी घट होणार आहे. युरोपियन आणि उत्तर अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे सरासरी आयुर्मानात १० टक्के घट होऊ शकते. तसेच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या भागातील आयुर्मानावर याचा परिणाम अधिक दिसू शकतो, अशी भीती या शोधनिबंधातून व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील आरोग्य सेवा, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा केली नाही तर भविष्यात परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
चीनमधील शांघाई विद्यापीठाच्या आशियाई लोकसंख्या संशोधन विभागाचे असोसिएट्स प्राध्यापक गिलियूम मारोस यांनी या संशोधनाबाबत सांगितले की, आयुर्मानावरील कोरोना विषाणूचा परिणाम आधीपासूनच दिसून येऊ शकतो.