Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:58 PM2021-07-06T15:58:37+5:302021-07-06T16:26:28+5:30

Corona vaccine : कोरोना लसीमुळे काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढत आहे.

कोरोना रोखण्यासाठी, सर्व लोकांना लवकरात लवकर कोरोनावरील लस घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम (साइड इफेक्ट) सामान्य आहेत, परंतु अशी काही प्रकरणे आहेत, जी डॉक्टरांसाठी चिंताजनक बनली आहे. कोरोना लसीमुळे काही रुग्णांमध्ये रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढत आहे. विशेषत: मधुमेहाच्या (डायबिटीज ) रुग्णांमध्ये असे दिसून येत आहे.

दिल्लीच्या फोर्टिस सी-डॉक सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर डायबिटीज हॉस्पिटलने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, नुकतेच लसमुळे ब्लड शुगर वाढण्याची 7-8 प्रकरणे आढळली आहेत. यामध्ये एक 58 वर्षीय महिला देखील आहे, तिला गेल्या 20 वर्षांपासून टाइप 2 डायबिटीज आहे.

मेडिकल जर्नल, डायबिटीज अँड मेटाबोलिक सिंड्रोममध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार या महिलेने 4 मार्च रोजी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला होता. फोर्टिस सी-डॉकचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा म्हणाले, "लस घेण्यापूर्वी या महिलेचे ब्लड ग्लुकोज लेव्हल औषधे आणि डाइटद्वारे पूर्णपणे नियंत्रणात होती, परंतु लस घेतल्यानंतर एक महिन्यापर्यंत ती वाढल्याचे दिसून आले. महिलेची डायबिटीजचे औषध मेटफॉर्मिनचा डोस वाढवावा लागला."

आणखी एका 64 वर्षीय व्यक्तीने 18 जानेवारीला कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला. मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार त्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर 130/80 मिमी एचजीहून 160/90 मिमी पर्यंत वाढले. या व्यतिरिक्त या व्यक्तीने काही तासांपर्यंत टॅचीकार्डिया, घाम येणे आणि हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याच्या तक्रारी केल्या.

लस घेतल्यानंतर या व्यक्तीचे ब्लड शुगर तीन दिवस वाढत राहिले, जे हळूहळू स्वतःच सामान्य झाले. असेच आखणी एक प्रकरण 65 वर्षांच्या व्यक्तीमध्ये दिसून आले आहे, या व्यक्तीने लस घेतल्यानंतर त्यांची ब्लड शुगर वाढली, जी 15 दिवसांत कोणत्याही प्रयत्नाशिवाय स्वतःच सामान्य झाली.

कोव्हिशिल्ड लसीच्या सामान्य साइड इफेक्टमध्ये थकवा, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, ताप यासारखी लक्षणे समाविष्ट आहेत. पोटात दुखणे, लिम्फ नोड्स वाढणे, खाज सुटणे किंवा पुरळ यासारखे लक्षणेही काही लोकांमध्ये दिसून येत आहेत. मात्र, रूग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हाय ब्लड प्रेशर वाढणे किंवा ब्लड ग्लुकोजमधील कोणत्याही बदलांची नोंद या लसीच्या चाचणीच्या आकडेवारीमध्ये आढळली नाही.

जर्नलच्या रिपोर्टनुसार, 'तिन्ही प्रकरणांमध्ये चांगला डाइट आणि एक्सरसाइजद्वारे बर्‍याच काळापर्यंत ग्लायसेमिक कंट्रोल करण्यास मदत झाली. या प्रकरणांमध्ये, ब्लड ग्लुकोज वाढण्याची सर्व कारणे वगळण्यात आली होती. लसीमुळे त्यांचा ब्लड ग्लुकोजची लेव्हल अचानक वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. मिश्रा म्हणाले, 'चांगली गोष्ट म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये ब्लड शुगर लेव्हल आपोआपच योग्य पातळीवर आली आणि उपचारांमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची गरज पडली नाही. मात्र, डायबिटिजच्या रुग्णांना अचानक ब्लड शुगर किंवा ब्लड प्रशेर वाढण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. सतर्क राहून कोणतीही मोठी समस्या रोखली जाऊ शकते.'

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देखील यावर्षी मार्चमध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांसाठी कोविड मार्गदर्शक सूचना जारी केली. मार्गदर्शक सूचनात असे म्हटले होते की, कोरोना संकटात शुगर, बीपी, हृदयविकार रुग्णांनी सर्व नियमित औषधे सुरू ठेवावीत. जोपर्यंत डॉक्टर इतर सल्ला देत नाहीत, तोपर्यंत औषधे घेणे थांबवू नका.

आयसीएमआरने म्हटले आहे की, ब्लड प्रेशरची औषधे कोरोनाची तीव्रता वाढवतात, याचा पुरावा मिळालेला नाही. ब्लड प्रेशरची औषधे हृदयासाठी प्रभावी आहेत. हाय ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यात आणि हार्ट फेल होण्यापासून रोखण्यासाठी ही औषधे खूप प्रभावी आहेत. ही औषधे स्वत: बंद करणे हानिकारक असू शकते.