Covishield: कोरोना ज्यांना अद्याप शिवूही शकला नाही, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी; कोव्हिशील्ड घेतली असेल तर... By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:57 PM 2022-04-25T14:57:32+5:30 2022-04-25T15:04:23+5:30
ICMR Study on CoVishield वैज्ञानिकांनी ओमायक्रॉनविरोधात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या संस्थांनी बनविलेली कोव्हिशील्ड लशीच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिअंटने जगाला पुन्हा धोक्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. याचवेळी वैज्ञानिकांनी ओमायक्रॉनविरोधात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या संस्थांनी बनविलेली कोव्हिशील्ड लशीच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे.
ज्या लोकांना कोव्हिशील्डचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि जे अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून दूर आहेत, त्यांच्यात ओमायक्रॉन BA.1 व्हेरिअंटविरोधात लढण्याची ताकद कमी असल्याचे दिसून आल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे.
मात्र, कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले आणि कोरोना संक्रमण झालेल्या लोकांमध्ये कोरोना न झालेल्या लोकांपेक्षा जास्त लढण्याची क्षमता असल्याचे दिसले आहे. देशातील अशी मोठी लोकसंख्या आहे, जी अद्याप कोरोनाच्या कचाट्यापासून दूर आहे.
आयसीएमआरची नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ व्हाय़रॉलॉजीद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये बुस्टर डोस घेण्याची गरज किती आहे, याकडे लक्ष देण्यात आले आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर १८० दिवसांनी ज्यांना कोरोनाचे संक्रमण झाले त्यांचे सॅम्पल घेण्यात आले होते.
सोबतच अशा १७ जणांचे सॅम्पल घेण्यात आले आहेत, ज्यांना कोरोना अद्याप झालेला नाही आणि त्यांनी कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतले होते. या लोकांमध्ये ओमायक्रॉनचे संक्रमण झाले होते.
तिसऱ्या गटामध्ये अशा लोकांचे सॅम्पल घेण्यात आले जे कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर SARS-CoV-2 रुग्णांच्या संपर्कात आले होते. या लोकांचे सॅम्पल संपर्कात आल्यानंतर १४-३० दिवसांत कलेक्ट करण्यात आले होते. यातून केवळ 21 प्रकरणांमध्ये कंप्लिट जीनोम पुन्हा एकदा प्राप्त करण्यात आले.
या सॅम्पल्सचा अभ्यास केल्यावर असे आढळले की, या लोकांनी B.1, बीटा आणि डेल्टा व्हेरिअंटला ओमायक्रॉनपेक्षा जास्त ताकदीने निष्प्रभ ठरविले. या सीरम सॅम्पलमध्ये ओमायक्रॉनविरोधात अँटीबॉडीची सरासरी सर्वात कमी म्हणजे 0.11 टक्के एवढी सापडली. तर अन्य रुग्णांमध्ये याची सरासरी 11.28 आणि 26.25 होती.
ओमायक्रॉन हा लसीकरण झालेल्या लोकांमध्ये सुरक्षा कवचाला दगा देऊन वाचण्यास समर्थ आहे. यापूर्वीच्या संशोधनात कोरोना लसीच्या दुहेरी डोसची अँटीबॉडी ही सहा महिन्यांनी कमी होऊ लागते.
या संशोधनात दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये असे ४० लोक होते ज्यांनी पहिला कोविशिल्ड आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा डोस घेतला होता. या लोकांनी डेल्टाला चांगला प्रतिकार केला, मात्र ओमायक्रॉनविरोधात अँटीबॉडी कमी झालेल्या दिसल्या.