लॅपटॉपवर काम करता करता मृत्यू; नेमकं कारण काय असेल?, रिपोर्ट वाचा, सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:11 PM2024-06-27T15:11:12+5:302024-06-27T15:16:08+5:30

सध्याच्या धावपळीच्या काळात वयाच्या अवघ्या १४,१९,२२, २४, २६,३० आणि ३५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसत असेल. पण हे सध्या का घडतंय त्याच्याकडे आपण नजर चुकवून चालणार नाही

एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. त्यात कुठल्यातरी खासगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करणारा व्यक्ती रोजप्रमाणे काम करत असतो. त्याच्या आजूबाजूला इतर सहकारी बसलेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. दरदिवशीसारखं सर्व काही ठीक होतं.

परंतु अचानक एकाएक लॅपटॉपवर काम करता करता मॅनेजर त्याच्या खुर्चीच्या मागे वाकला. पहिल्यांदा डोक्यावर त्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवू लागला. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन मागील बाजूस वाकतो. इतर सहकाऱ्यांना हे नॉर्मल वाटत होते. परंतु काही सेकंदात तो बेशुद्ध झाल्याचं सहकाऱ्यांना कळतं.

त्याला जमिनीवर झोपवतात, हात पाय चोळतात त्यानंतर हॉस्पिटलला घेऊन जातात तिथे डॉक्टर त्याला मृत घोषित करतो. त्याच्या मृत्यूचं कारण ठरतं हार्ट अटॅक, ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्याचे वय ३० होते. या मृत्यूनंतर युवकाच्या दिनचर्येबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नुकतेच लॅन्सेटनं एक रिपोर्ट प्रकाशित केला. या रिपोर्टनुसार, २०३० पर्यंत देशातील ६० टक्क्याहून अधिक जनता निष्क्रिय होईल. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शारिरीक हालचाली नसणे. त्यामुळेच लोकसंख्येतील मोठ्या प्रमाणात जनतेला आजाराचा शिकार बनायला लागेल

लॅन्सेटच्या अहवालानुसार, २००० ते २०२२ दरम्यान १९७ देशांतील लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये २०२२ मध्ये ५२.६ टक्के महिला आणि ३८.४ टक्के पुरुष शारीरिकदृष्ट्या सक्रिय नव्हते असं आढळून आले. लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन आकडेवारीनुसार, ४२ टक्के पुरुषांपेक्षा ५७ टक्के अधिक महिला शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे भारतीय प्रौढांमध्ये शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असण्याचे प्रमाण २००० मध्ये 22.3 टक्क्यांवरून २०२२ मध्ये ४९.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शरीराला कुठलीही हालचाल नसल्याने युवा वर्ग याला बळी जात आहेत.

अपुऱ्या शारीरिक हालचालींच्या बाबतीत भारत १९७ देशांमध्ये १२ व्या क्रमांकावर आहे. जगभरात, जवळजवळ एक तृतीयांश (३१ टक्के) प्रौढ किंवा सुमारे १.८ अब्ज लोक २०२२ मध्ये शिफारस केलेल्या शारीरिक हालचालींची पूर्तता करत नाहीत.

WHO चे हेल्थ प्रमोशनचे संचालक डॉ रुडिगर क्रेच म्हणतात की, यामागील कारणांमध्ये कामाच्या पद्धतींमध्ये बदल, वातावरणातील बदल, सोयीस्कर वाहतूक पद्धती आणि फुरसतीच्या वेळेतील जीवनशैलीमध्ये बदल यांचा समावेश होतो.

आशिया-पॅसिफिक प्रदेश (४८ टक्के) आणि दक्षिण आशिया (४५ टक्के) मध्ये शारीरिक निष्क्रियतेची सर्वोच्च पातळी दिसून आली. इतर प्रदेशांमध्ये निष्क्रियता पातळी पाश्चात्य देशांमध्ये २८ टक्के ते १४ टक्के आहे.