ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:42 PM 2021-12-18T18:42:52+5:30 2021-12-18T18:46:36+5:30
देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डॉक्टरांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट असलेला ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होत असल्याचं दिसून येत आहे. याआधी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं देशासह संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. एप्रिल आणि मे महिन्या डेल्टा व्हेरिअंटमध्ये भारतात तर जबरदस्त लाट आली होती. यात लाखो जणांना आपला जीव गमावावा लागला होता.
आता डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संगमामुळे आणखी मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओमायक्रॉन नावाच्या नव्या म्युटेंट व्हेरिअंटनं धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे तज्ज्ञांसमोरील आव्हान देखील वाढलं आहे. ओमायक्रॉनची घातकता समजून घेण्यासाठी त्यावर शास्त्रज्ञ दिवसरात्र अभ्यास करत आहेत.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात एक गोष्ट मात्र प्रकर्षानं समोर आली आहे ती म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या एकाही रुग्णालयाला कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज भासलेली नाही. पण एखाद्या रुग्णाला कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिअंटची एकाच वेळी लागण झाल्यास 'सुपर स्ट्रेन' निर्माण होऊन धोका अधिक बळावू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिअंटमध्ये कोरोना लसीच्या विरोधात उच्च प्रतिच्या स्पाइक प्रोटीन आढळून आलं आहे की जे डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही ३० पटीनं अधिक आहे. त्यामुळे या व्हेरिअंटला नियंत्रित करणं अधिक कठीण होऊन बसणार आहे.
दिल्लीतील LNJP रुग्णालयाचे संचालक सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार द.आफ्रिके किंवा युरोपातून WHO चा जो डेटा आला आहे त्यानुसार ओमायक्रॉनची लक्षणं अतिशय सामान्य स्वरुपाची आहेत. LNJP रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ओमायक्रॉनच्या २० पैकी १८ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. केवळ २ रुग्णांमध्ये सामान्य स्वरुपाची लक्षणं आढळून आली आहेत.
१८ रुग्णांना केवळ सौम्य स्वरुपाचा ताप आहे आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. इतर कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. घशात थोडं खवखवण्याची तक्रार रुग्णांची होती. पण त्यांचं ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन पातळी सामान्य होती. रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज भासली नाही.
ताप आणि इतर काही सौम्य स्वरुपाची लक्षणं आढळून आलेल्या दोन रुग्णांवर प्रोटोकॉलनुसार उपचार केल्यानंतर अवघ्या ३ दिवसांत बरे देखील झाले. तर आतापर्यंत एकूण १० रुग्णांना त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती डॉ. सुरेश कुमार यांनी दिली आहे.
डॉ. सुरेश कुमार यांच्या माहितीनुसार ओमायक्रॉनच्या रुग्णांना क्वचितच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येईल असा अंदाज आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची काहीच गरज नाही. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये डेल्टाप्रमाणे श्वास घेण्यास खूप अडचण, कफ, थंडीतापासारखी गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिअंटनं धुमाकूळ घातला होता. यात रुग्णालयापासून रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील ऑक्सिजन मिळवण्यासाठी खूप हाल झालेले पाहायला मिळाले होते. पण ओमायक्रॉनच्या बाबतीत अद्याप तरी तसं काही होईल असं वाटत नाही. कारण LNJP रुग्णालयात दाखल झालेल्या ओमायक्रॉनच्या २० रुग्णांपैकी एकालाही ऑक्सिजनची किंवा आयसीयूत दाखल करण्याची गरज भासली नाही, असं डॉ. सुरेश कुमार म्हणाले.