Corona Vaccination: ...तर त्या डोसचा उपयोग फक्त १० टक्के; कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:20 PM2021-07-10T19:20:48+5:302021-07-10T19:26:34+5:30

Corona Vaccination: देशाच्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक वापर कोविशील्डचा

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे.

देशात लसीकरणासाठी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा सर्वाधिक वापर केला जात आहे. कोविशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून केली जात आहे. सीरमची उत्पादन क्षमता जास्त असल्यानं देशात बहुतांश लोकांना कोविशील्डची लस मिळाली आहे.

कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. पुढील महिन्यात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाऱ्या बहुतांश भागांतील निर्बंध शिथिल झाल्यानं लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.

देशात सर्वाधिक लोकांनी कोविशील्ड लस घेतली असताना या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या पार्श्चर इन्स्टिट्यूटचा एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोना लसीचा एक डोस बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरोधात फारसा प्रभावी ठरत नसल्याची माहिती सर्वेक्षण अहवालातून पुढे आली आहे.

पार्श्चर इन्स्टिट्यूटनं ऍस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएनटेक लस घेतलेल्यांवर सर्वेक्षण केलं. हा सर्वेक्षण अहवाल जगप्रसिद्ध विज्ञान मासिक नेचरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ऍस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे.

कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती डेल्टा व्हेरिएंटला निष्प्रभ करते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीबद्दल पार्श्चर इन्स्टिट्यूटचे विषाणू आणि रोगप्रतिकारशक्ती युनिटच्या प्रमुखांनी आनंद व्यक्त केला.

कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांपैकी केवळ १० टक्के व्यक्तींना बिटा आणि डेल्टा व्हेरिएंटचा हल्ला परतवून लावता आला. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ९५ टक्के व्यक्तींनी डेल्टा आणि बिटाचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला.

लसीचा एक डोस घेतलेल्यांच्या तुलनेत लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक अधिक सुरक्षित असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका टाळायचा असल्यास कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस गरजेचे असल्याचं सर्वेक्षणातून अधोरेखित झालं आहे. कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्यास ९५ टक्के व्यक्ती डेल्टाचा हल्ला निष्प्रभ करू शकतात.