बापरे! ताप आलाय, अंग दुखतंय पण नेमका कोरोना झालाय की डेंग्यू?; 'असा' ओळखा फरक By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:04 PM 2022-10-03T12:04:32+5:30 2022-10-03T12:54:51+5:30
Dengue And Covid 19 : पावसाळ्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे, तर सणासुदीच्या काळात कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत आणि अशा परिस्थितीत अनेकांमध्ये या दोन्हीची लक्षणे दिसून येत आहेत. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना व्हायरसचे रुग्ण हे सातत्याने समोर येत आहेत. पण याच दरम्यान, पावसाळ्यानंतर अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अनेक रुग्णांमध्ये या दोघांची समान लक्षणे दिसत आहेत. तज्ञ देखील यामुळे हैराण झालेले पाहायला मिळत आहेत.
दोघांमध्ये समान लक्षणे कशी असू शकतात आणि त्यांना कसे ओळखावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण या दोघांच्या समान लक्षणांमध्ये, लोकांना सर्दीसह अंगदुखी आणि इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याचवेळी डेंग्यूच्या रुग्णांनी अधिकाऱ्यांची चिंता वाढवून संभ्रम निर्माण केला आहे.
पुण्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे कोरोना आणि डेंग्यूची समान लक्षणे दिसली आहेत. परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे, तर सणासुदीच्या काळात कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत आणि अशा परिस्थितीत अनेकांमध्ये या दोन्हीची लक्षणे दिसून येत आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांना कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांकडे जावे. तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला घेऊनच कोणताही उपाय करावा.
डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे ओळखण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अशा परिस्थितीत एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही या दोघांची लक्षणे ओळखू शकता. ते म्हणजे श्वसन समस्या किंवा त्यांची लक्षणे आहेत. डेंग्यूमध्ये तुम्हाला श्वासोच्छवासासंबंधित कोणतीही समस्या नसते.
डेंग्यूमध्ये तुम्हाला तीव्र अंगदुखीसह ताप येऊ शकतो. तर डेंग्यूची सर्व लक्षणे कोरोनामध्ये जाणवत असली तरी श्वसनाच्या समस्येशी संबंधित लक्षणे जास्त जाणवतील. कारण डेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार आहे, तर कोरोना हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, डेंग्यू आणि कोरोना व्हायरसची लक्षणे असलेले बहुतेक लोक घरीच बरे होऊ शकतात. पण, सुरुवातीलाच डॉक्टरांकडे जा म्हणजे उपचार योग्य पद्धतीने करता येईल. कोरोनाच्या काळात अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.