रोज धावण्याचा व्यायाम करताय? 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:41 PM 2021-07-29T13:41:16+5:30 2021-07-29T13:58:12+5:30
दैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश करून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं.. फिटनेसच्या बाबतीत पाहिले प्राधान्य धावण्याला दिले जाते. धावण्यामुळे आपल्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात. हे बदल शारिरीक व मानसिकही असतात.
मात्र हेच धावणे जर चूकीच्या पद्धतीने असेल तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात.
‘रनर्स नी’ ही साधारणपणे नेहमी होणारी दुखापत आहे. त्याची अनेक कारणे असतात; पण मुख्यतः गुडघ्याची वाटी सरकण्यामुळे हा त्रास होतो. चुकीच्या पद्धतीने धावल्याने पायाचे स्नायू आखडले जातात, स्नायूच्या दुखापती वाढतात.
मसल पुल म्हणजे धावताना अचानक झालेली स्नायूंची इजा. यामध्ये स्नायूंना अचानक तड लागणे, चमक भरल्यासारखे होणे असा त्रास होतो. यात दुखण्याची तीव्रता जास्त असते. बरेचदा इजा झालेल्या स्नायूंमधून ठणका मारल्यासारखे होते. हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, पोटरी, या भागांत साधारणपणे हा त्रास जाणवतो.
घोटा मुरगळणे म्हणजे घोट्याभोवती असलेल्या स्नायूंना इजा पोहोचणे. रनिंग करताना उंचसखल रस्त्यावर घोटा मुरगळू शकतो. या दुखापतीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. थोडा आराम केल्यावर हा त्रास कमी होऊ शकतो.
रनिंगला सुरुवात करण्याआधी धावण्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे गरजेचे असते. अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहाराला काट मारून वेगाने चालणे केव्हाही धोकादायक. कारण यात पायाच्या स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.
कोणाचेही पाहून धावणे सोपे नाही, त्याची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या, गुडघेदुखी, पायदुखी, घोटेदुखीच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने धावल्याने निर्माण होऊ शकतात.
पळण्याचा अतिरेक करू नका, शरिराची ठेवण लक्षात घ्या. आपल्या वजनाप्रमाणे किती पळायचे आहे हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निश्चित करा.
चुकीच्या पद्धतीने धावल्यामुळे गुडघ्यांतील कार्टिलेजची झीज होते व दुखापत वाढत जाते. जिना चढणे-उतरणे, उकिडवे बसणे, बराच काळ गुडघे वाकवून बसणे यामुळे दुखणे वाढू शकते.
अकिलिझ टेंडनायटिसमध्ये पायाचे स्नायू दुखावतात, ते ताठर होतात. पळण्याचे अंतर नेहमीपेक्षा अधिक वाढवल्याने स्नायूवर सतत ताण येतो आणि दुखणे जाणवते.