Sleeping Health Tips: तुम्ही, तुमच्या घरातलं कोणी पोटावर झोपतं? फायदा काय आणि तोटा काय?...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:48 AM2022-12-15T09:48:01+5:302022-12-15T09:51:23+5:30

खरंतर पोटावर झोपण्याचेही काही फायदे आहेत. ते सोडले तर दुष्परिणामच जास्त आहेत.

पाठीवर झोपावं, कुशीवर झोपावं की पोटावर झोपावं? - झोपण्याच्या बाबतीत अनेकांसाठी हा कळीचा प्रश्न आहे. नेमकं कुठल्या स्थितीत झोपणं चांगलं याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. कुशीवर, त्यातही डाव्या कुशीवर झोपणं चांगलं, हे आपण याच सदरात काही दिवसांपूर्वी वाचलं होतं.

पोटावर झोपणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं, हेही आपण याच सदरात वाचलं होतं; पण पोटावर का झोपू नये? त्यामुळे असं काय बिघडतं, असा सवाल (पोटावर झोपणाऱ्या अनेकांनी) विचारला होता. 

खरंतर पोटावर झोपण्याचेही काही फायदे आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला जर श्वासोच्छवासाचा त्रास असेल तर पोटावर झोपण्यामुळे तो त्रास तुम्हाला कमी प्रमाणात जाणवू शकतो, त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचा (इतरांसाठीचा) फायदा म्हणजे पोटावर झोपण्यामुळे तुमचं घोरणं कमी होऊ शकतं! पण हा फायदा सोडला तर पोटावर झोपण्याचे दुष्परिणामच जास्त आहेत. पोटावर झोपण्यामुळे तुमच्या पाठीला, मानेला आणि मणक्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. 

कारण ज्यावेळी तुम्ही पोटावर झोपता, त्यावेळी तुमच्या शरीराचा बहुतांश भार तुमच्या शरीराच्या मध्यभागी म्हणजेच पाठीवर येतो. पोटावर झोपल्यामुळे मानेवरही ताण येतो. मान काहीशी आखडते. त्यामुळे मान आणि पाठ या आपल्या मुख्य अवयवांना आरामच मिळत नाही. ना रात्री, ना दिवसा. त्यामुळे मान आणि पाठदुखीचा विकार बळावू शकतो.

पाठीवर झोपणाऱ्या अनेकांना मान आणि पाठदुखी होऊ शकते किंवा आधीच ही दुखणी असतील, तर ती आणखी उफाळून येऊ शकतात.

दिवसा जेव्हा आपण आपल्या कामात असताना श्वासोच्छवास घेत असतो, त्यावेळी मुख्यत्वे आपल्या प्राथमिक स्नायूंचा वापर केला जातो; पण ज्यावेळी आपण झोपतो, त्यावेळी विशेषत: पोटाच्या व इतर अतिरिक्त स्नायूंचा वापर होतो. 

साधा विचार करून पाहा, आपण जर पोटावर झोपलो, तर साहजिकच आपल्या पोटाच्या स्नायूंच्या हालचालींवर मर्यादा येतात. पोट आपण जास्त हलवू शकत नाही. त्याचवेळी फुफ्फुसांना विस्तारण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नाही. 

त्यामुळे लक्षात ठेवा, डाव्या कुशीवर झोपणं सर्वोत्तम, पाठीवरही तुम्ही झोपू शकता; पण पोटावर झोपणार असाल, तर जरा सांभाळून!