जास्त मीठ खाल, दवाखान्यात जाल! आजार लागतील मागे, मीठ जपून खाण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:26 PM 2022-07-22T16:26:44+5:30 2022-07-22T17:08:16+5:30
Medical Expert advise to eat salt sparingly : रोजच्या आहारात मिठाचा वापर गरजेपेक्षा अधिक वाढल्याने ते अनेक आजाराचे कारण बनत असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. आहारात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अशा व्यक्तींना रक्तदाब आणि हृदयरोगाच्या विकारांना सामोरे जावे लागते. जेवणाच्या ताटात चवीपुरते मीठ असावे. वाढताना चिमूटभरच वाढतात पण अनेकजण अतिरिक्त मीठ मागून घेतात.
पदार्थाची चव अधिक रुचकर होण्यासाठी ते अधिक टिकून राहावेत म्हणून मिठाचा वापर केला जातो. प्रक्रिया केलेल्या पदार्थात जास्त मीठ असण्याचा धोका असतो. डॉक्टर अनेकवेळा मिठापासून दूर राहण्याचा सल्ला सर्वांनाच देतात. मात्र, तो बहुतेकवेळा दुर्लक्षित केला जातो. यामुळे वेगवेगळ्या आजारांशी सामना करावा लागू शकतो.
मिठाचे प्रकार कोणते? : • साधे मीठ या मिठात सोडियम आणि आयोडीनचे प्रमाण पुरेसे असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण गरजेपेक्षा जास्त खाण्यात आल्यास धोकादायक ठरते.
सैंधव मीठ : या मिठात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हे मीठ आरोग्यास लाभदायक सांगितले जाते. पण तेही प्रमाणातच असावे.
काळे मीठ : पचनासाठी या मिठाचा फायदा होतो. पण फ्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याने ते प्रमाणातच सेवन करावे असा सल्ला देण्यात येतो.
लो सोडियम मीठ : याला पोटॅशियम मीठ असे देखील म्हणता. हृदयाशी संबंधित आजारात उपयुक्त असलेले हे मोठं मधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक शिफारशीनुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दिवसाला पाच ग्रामपेक्षा अधिक मीठ सेवन करू नये. सरासरी २ ग्राम मिठाचे सेवन केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने मिठाचे आहारात प्रमाण किती असावे याच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याला अनुसरून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांनी २०२५ पर्यंत मिठाचा वापर निम्म्यावर आणण्याचे ठरवले आहे. यात यश आल्यास २५ लाख मृत्यू कमी होतील. मात्र, विविध देशात ९ ते १२ ग्राम मिठाचे सेवन केले जाते. ते गरजेपेक्षा अधिक आहे.
दररोज पाच ग्रामपेक्षा कमी मीठ खा. सुटे मीठ खाण्यासाठी वापरू नका. त्यात आयोडीन नसते. बाजारात कमी सोडियम असलेले मीठ मिळते. ते आहारात असावे. सोडियम हा मिठातील प्रमुख घटक आहे. या घटकामुळे बीपी वाढते. ज्या पदार्थात सोडियम जास्त आहे. त्या पदार्थामुळे बीपी वाढतो - डॉ. विकास जोशी
अति मीठ खाल्ल्याने वाढतील आजार : प्रमाणापेक्षा अति मीठ खाण्यात येत असेल, तर बीपी वाढतो. त्यातून हृदयविकार, किडनीवर परिणाम, ब्रेन हॅमरेज, दृष्टी कमी होणे आदी आजारांशी सामना करावा लागू शकतो.