सावधान! 'ही' 5 लक्षणं असू शकतात Diabetes ची सुरुवात; दुर्लक्ष करणं पडेल चांगलंच महागात By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:51 PM 2022-03-16T15:51:30+5:30 2022-03-16T16:10:27+5:30
Unusual Symptoms of Diabetes : मधुमेहाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण नियंत्रणात येऊ शकतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. डायबिटीज (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. दुर्दैवाने हा आजार आता भारतात सर्वात वेगाने पसरत आहे आणि या कारणास्तव भारताला 'मधुमेहाची राजधानी' म्हटले जाते.
एका रिपोर्टनुसार, जगभरात टाइप-2 मधुमेहाचे 50 मिलीयनपेक्षा अधिक रुग्ण आहेत, ज्यामध्ये भारतात सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या अंदाजानुसार मधुमेहामुळे किंवा रक्तातील साखर वाढल्याने जगभरात 3.4 दशलक्ष मृत्यू होतात.
हा एक कोणताही उपचार नसलेला आजार असल्याने त्यावर नियंत्रण मिळवूनच निरोगी जीवन जगता येते. तज्ज्ञांचे मत आहे की, सुरुवातीच्या अवस्थेत औषधांद्वारे तो आटोक्यात आणला जाऊ शकतो.
मधुमेहाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण नियंत्रणात येऊ शकतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मेडिकल एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की लक्षणे वेळेवर ओळखल्यास आणि नियमित तपासणी केल्यास डायबिटीज टाळता येऊ शकतो.
लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे काही लक्षणं जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून लवकर बरे होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊया...
विनाकारण थकवा जाणवणं तुम्ही जर रात्री चांगली, शांत झोप घेत असाल पण तरीही तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्ही रक्तातील साखरेची तपासणी करून घ्यावी.
एक्सपर्ट्स मानतात की थकवा जाणवणे हे निश्चितपणे मधुमेहाचेच एक लक्षण आहे. थकवा हे इतर अनेक रोगांचे लक्षण किंवा संकेत असू शकते. म्हणूनच कोणत्याही समस्यांबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे.
नाश्त्यानंतरही भूक लागणे जर तुम्हाला पोटभर नाश्ता करूनही भूक लागत असेल तर हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते ज्यासाठी ताबडतोब तपासणी करणं गरजेचं आहे. मधुमेहामध्ये तुम्हाला जेवल्यानंतरही खूप भूक लागते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्या स्नायूंना अन्नातून आवश्यक ऊर्जा मिळत नाही. तुमच्या शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता ग्लुकोजला स्नायूंमध्ये प्रवेश करण्यापासून आणि ऊर्जा प्रदान करण्यापासून प्रतिबंधित करते.
हाता-पायांना मुंग्या येणं हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे हे टाइप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यामुळे असे होऊ शकते.
जेव्हा मज्जातंतू खराब होतात तेव्हा तुम्हाला मुंग्या येणे, पिन टोचल्यासारखं वाटणे, जळजळ किंवा तीक्ष्ण वेदना जाणवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना कधीही मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते.
विनाकारण वजन कमी होणे जर तुम्ही वेटलॉस करत नसाल आणि हेल्दी आहार घेत असाल तरीही दिवसेंदिवस वजन कमी होत असेल तर तुम्ही सतर्क राहायला हवे. तज्ज्ञांच्या मते हे ब्लड शुगरचे लक्षण असू शकते. हे काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंत राहू शकते.
जेव्हा ग्लुकोज तुमच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही तेव्हा तुमचे शरीर समजू लागते की तुम्ही भुकेने मरत आहात आणि ती भरपाई करण्याचा मार्ग ते शोधू लागते. अशावेळी ते फॅट आणि स्नायू वेगाने बर्न करून ऊर्जा निर्माण करते.
सतत लघवी होणे पुरेसे पाणी प्यायल्यानंतर दिवसातून पाच ते सहा वेळा लघवी होणे हे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल किंवा झोपत असतानाही लघवीला होत असेल तर हे मधुमेहाचे स्पष्ट लक्षण असू शकते.
जर तुमची लघवी फेसाळ दिसत असेल तर ते तुमच्या लघवीमध्ये प्रथिने असल्याचे लक्षण असू शकते. हे सहसा तुमच्या किडनीत काहीतरी समस्या असल्याचं दर्शवते. ज्यामध्ये रक्तातील हाय ब्लड शुगरशी सामना करण्याचा प्रयत्न समाविष्ट असू शकतो, जसे की मधुमेहामध्ये होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)