कोरोनाकाळात सकाळी उठून करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वाटेल आनंदी आणि स्वस्थ By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:12 PM 2021-07-16T14:12:04+5:30 2021-07-16T14:25:47+5:30
सध्या कोरोनामुळे अशी जीवनशैली झाली आहे की दिवस सतत तणावपूर्ण असतो. वर्क फ्रॉम होमचं टेन्शन, जीवनशैलीत झालेला बदल, आजाराची भीती, जवळच्यांच्या आरोग्याची काळजी, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे आपले आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. यावर उपाय काय अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वाचा पुढे... आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे महत्वाचे आहे. दिवसा उठल्या उठल्या आपण अशा काही सवयी लावून घ्याव्यात ज्यामुळे दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाल...
सकाळी लवकर उठा: आयुर्वेदात सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुम्ही ब्रम्ह मुहुर्तावर म्हणजे सुर्योदय होण्यापुर्वी दोन तास आधी उठले पाहिजे. जर तुम्ही लवकर उठु शकत नसाल तर याची सवय हळूहळू तुम्ही लावून घेतली पाहिजे.
चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा: चेहऱ्यावर स्वच्छ आणि थंड पाण्याचे हबकारे मारल्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते. आयुर्वेदात याला महत्व आहे. विशेषत: डोळ्यांवर पाण्याचे हबकारे मारावेत. मात्र लक्षात असू द्या ते पाणी अगदी गरम किंवा अगदी थंड नसावे तर सामान्य तापमानाइतके त्याचे तापमान असावे.
पोट साफ करणे- पहाटे उठल्यानंतर साफ शौचास होणे अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदात असे सांगितले आहे की रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी उठल्यानंतर मलविसर्जन होणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात.
दात स्वच्छ करणे- झोपे दरम्यान आपल्या तोंडात अनेक जीवाणू जमा झालेले असतात. ते सकाळी ब्रशने स्वच्छ करावेत. तसेच ब्रश वेळोवेळी बदलत राहावा. शक्यतो कडू चव असणाऱ्या थुटपेस्टनं दात घासावेत.
गुळण्या करणे- बरेचदा खोकला झाल्यास अथवा घशाचा काही आजार असल्यास गुळण्या केल्या जातात. पण दररोज मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने हिरड्या स्वच्छ राहतात.
मालिश करणे- आयुर्वेदात तेलाने शरीराची मालिश करण्यावर भर दिलेला आहे. तुम्ही दररोज केलाने मालिश केली पाहिजे. त्यामुळे तुमची त्वचा मॉश्चराईज होईल. जे महागडे मॉश्चराईजर्स तुमच्या त्वचेला देऊ शकत नाहीत त्यापेक्षा अधिक पोषण तेलाची मालिश देते.
तुम्हाला दररोज मालिश करण शक्य नसेल तर आठवड्यातून तीनदा मालिश करावी. तसेच संपूर्ण अंगाला मालिश करणं शक्य नसेल तर हाता पायाचे तळवे, नाभी, डोक आणि कान याला मालिश जरूर करावी. ही मालिश स्नानाला जाण्यापूर्वी करावी.
व्यायाम करणे- आयुर्वेदात असे सांगितले आहे की दिवसाची सुरुवात व्यायामाने करावी. तुम्ही चालणे, योगा करणे, सुर्यनमस्कार असे व्यायाम करू शकता. लक्षात ठेवा साधे आणि हलके व्यायाम करा. शरीरावर जास्त जोर देऊ नका.
नाश्ता करणे- तुमची दिनचर्या उत्तम राखण्यासाठी उत्तम आणि भरपेट नाश्ता करावा. फळे, फळांचा रस, दही, भाज्या आदी पदार्थांचा नाश्यात समावेश असावा.