'या' कारणांमुळे किडनीचे विकार बळवण्याची जास्त शक्यता, आत्ताच करा आयुष्यातून हद्दपार By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:42 PM 2022-08-05T19:42:01+5:30 2022-08-05T19:55:16+5:30
आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे किडनीला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ती खराब होऊ शकते. त्यामुळे किडनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी काही काळजी घेणं आवश्यक आहे. मीठ प्रमाणात खा : मिठाच्या अतिसेवनामुळे शरिरात सोडियमचं प्रमाण वाढतं. वाढलेल्या सोडियममुळे रक्तदाबाची समस्याही वाढते आणि त्याचबरोबर व्यक्तीला मुतखडा होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी मीठ योग्य प्रमाणात खाणं चांगलं असतं.
जास्त पाणी प्या : भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील रक्त योग्यप्रकारे प्रवाहित होते. त्यामुळे किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
लघवी अडवू नका : शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्याचे प्रमुख काम किडनी करते. शरीरातील हे घटक मुत्रामार्गे बाहेर टाकले जातात. त्यामुळे लघवी आल्यास कधीही ती अडवू नये. यामुळे तुमची किडनी निरोगी राहते.
योग्य आहार घ्या : तुमच्या आहारावर तुमच्या किडनीचे आणि तुमचे एकूणच आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे कोणतेही आरोग्यास हानिकारक असलेले पदार्थ खाणे टाळावे आणि पौष्टिक घरचे पदार्थ खावे. तुमच्या आहारात कलिंगड, संत्री, लिंबू यासरखी फळं नक्की समाविष्ट करा. यामुळे तुमच्या किडनीचे आरोग्य उत्तम राहते.
व्यसन करणे टाळा : जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणार्या हार्मोन्सवर दुष्परिणाम होतो.
योग्य व्यायाम करा : लठ्ठ्पणाचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे.
प्रोटीनयुक्त पौष्टिक आहार आरोग्यासाठी चांगला असतो. पण अधिक प्रमाणात याचे सेवन करू नये. कारण तुमच्या किडनीचे कार्य योग्य प्रकारे होत नसेल तर प्रोटीन शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
जर तुम्हाला दिवसभरात जास्त प्रमाणात सोडा किंवा शीतपेय पिण्याची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या. एक किंवा दोन पेक्षा अधिक ग्लास शीतपेय पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे किडनीशी संबंधित आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.
तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतल्यास त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची मात्रा घ्या व स्वतःच स्वतःची औषधं ठरवणे टाळा.
मधुमेह , उच्च रक्तदाब व ह्र्दयरोग यासारख्या आजारांतून 'किडनीविकार' बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार , व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.