Health Care: 'आधीच हौस, त्यात पाऊस'; मॉर्निंग वॉकच्या संकल्पात अडथळा? असा करा घरी वॉक! By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:32 AM 2023-07-03T11:32:49+5:30 2023-07-03T11:37:14+5:30
Walking Tips: चालणे हा उत्तम व्यायाम आहे, हे आपल्याला माहीत आहेच. पण नेमकी मॉर्निंग वॉकला सुरुवात करायला आणि पावसाळा सुरू व्हायला एक गाठ पडली असेल तर तेवढे निमित्त सांगून लगेच घरी बसू नका, घरच्या घरी वॉक सुरू करा. कसा ते पहा! गावचे घर असेल तर घरात, दारात, परसात, अंगणात वॉक घेता येईल, पण शहरातल्या दहा बाय दहाच्या खोलीत कसा काय वॉक करणार, असेही कारण लगेच पुढे करू नका. घरच्या घरी वॉक करायला थोडीशी जागाही पुरते.
युट्युबवर 'walk at home' या शीर्षकाखाली अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहता पाहता आपण जागच्या जागी चालून त्याचे फायदे मिळवू शकतो. हे चालणे साधे चालणे नसून त्यात वेग्वेगळ्या कवायतींचा समावेश असल्याने सर्वांगाचा व्यायाम होतो.
कोरोनाच्या काळात जेव्हा सगळे जग चार भिंतींच्या आत अडकले होते, तेव्हा या घरच्या घरी चालण्याच्या पद्धतीचा अवलंब करून लाखो लोकांनी आपला फिटनेस मेंटेन केला.
दहा मिनिटांपासून एक तासापर्यंतच्या कालावधीचे व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार आणि वेळेनुसार व्हिडीओ सुरू करून ते पाहता पाहता सोपे व्यायाम प्रकार करत आपल्याला घरच्या घरी न कंटाळता व्यायाम करता येतो.
ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी मोकळ्या हवेत फिरणे केव्हाही चांगले, मात्र पावसाचे निमित्त करून आपल्या सवयीत खंड पाडण्यापेक्षा होम वॉकिंगचा पर्याय केव्हाही चांगला. मुख्य म्हणजे सर्व वयोगटातले लोक हा व्यायाम सहज करू शकतात.
एकदा का या व्यायाम प्रकाराची सवय लावून घेतलीत की अर्ध्या तासात दिवसभराच्या व्यायामाचा कोटा पूर्ण होईल. तुमच्या कामाच्या, ऑफिसच्या, शाळेच्या वेळा सांभाळूनही हा व्यायाम प्रकार सहज करता येईल.
व्यायाम करण्याचा नियम असा आहे, की तो आनंदाने केला पाहिजे, बळजबरीने नाही. होम वॉकिंग हा हसत खेळत व्यायाम करण्याचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वजन, कोलेस्ट्रॉल तर कमी होईलच शिवाय घाम गाळून केलेल्या परिश्रमामुळे हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतील.
तर पावसाची कारणे देणे बंद करा आणि होम वॉकिंगची सुरुवात करून आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी जीवन जगा.