Health Care: हसणं चांगलं तसं तब्येतीसाठी रडणंही चांगलंच; वाचा रडण्याचे फायदे-तोटे! By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 04:19 PM 2023-06-12T16:19:22+5:30 2023-06-12T16:24:24+5:30
Health Tips: 'रडू नकोस', हे बालपणापासून आपल्या मनावर बिंबवले गेले आहे, पण हसणे, आनंद व्यक्त करणे, रागावणे या जशा नैसर्गिक भावना आहेत, तसेच रडू येणेही नैसर्गिक आहे. उलट रडू येत असताना भावानांवर आवर घालणे अनैसर्गिक आहे. यासाठीच वाचा रडण्याचे फायदे आणि तोटे. काही लोकांना सतत परिस्थितीबद्दल रडण्याची सवय असते. त्यात अश्रू ढाळण्याची क्रिया नसली तरी कुरकुरत राहण्याचा स्वभाव बनतो. तसे रडणे याठिकाणी अपेक्षित नाही. दुःखाचा आवेग किंवा आनंदाश्रू डोळ्यात जमा झाले की त्यांना वाट करून देणे म्हणजे मन मोकळे करण्यासाठी रडणे! विज्ञान सांगते की हसणे आरोग्यासाठी जसे चांगले तसे कधी कधी रडणे हेही आरोग्यासाठी चांगले असते. रडण्यामुळे शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर लाभ होतात. कसे व कोणते ते जाणून घेऊया.
कमकुवत मनाचे लोकच अश्रू ढाळतात असे नाही किंवा जे अश्रू ढाळतात ते कमकुवत असतात असेही नाही. त्यामुळे रडण्याचा संबंध कमकुवत वृत्तीशी लावणे हेच मुळात चूक आहे. भावना प्रत्येकाला असते. कोणी व्यक्त होतात तर कोणी अव्यक्त राहणे पसंत करतात. मात्र भावनांचा वेळोवेळी निचरा व्हायला हवा, अन्यथा भावनांचा विस्फोट होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः दुःख मनात साचून राहिले तर शारीरिक व्याधी जडू शकतात. याउलट वेळच्या वेळी रडून मोकळे झाल्याने होणारे फायदे जाणून घेऊ.
रडण्याने तणाव कमी होतो एखाद्याच्या मनात खूप दुःख साचून राहिले असेल तर अशा व्यक्तीला बळे बळे रडायला भाग पाडले जाते. जेव्हा सगळ्या भावना गोठून जातात, त्यावेळी रडल्यामुळे अश्रूंवाटे भावना वाहून जातात, मन शांत होते. मनावरचा ताण हलका होतो. श्वास मोकळा होतो. नवीन विचारांसाठी मार्ग खुला होतो. मन, विचार भूतकाळात न अडकता भविष्याचा वेध घेऊ लागतात. आयुष्य तणावमुक्त होते.
झोप छान लागते जोवर मनात विचारांचे चक्र सुरू असते, तोवर झोप लागत नाही. विचार करून करून मेंदू शिणला की झोप लागते. तरीदेखील सकाळी उठल्यावर रात्री मनावर असलेला ताण जाणवत राहतो. त्यामुळे झोपण्याआधी भावनाविवश होऊन रडू आले तर मनसोक्त रडून घ्यावे. विचारांचे दडपण मनावर राहत नाही. मेंदू आणि मन शांत होते आणि क्षणार्धात झोप लागते.
डोळे स्वच्छ होतात रडण्याने तुमच्या डोळ्यांचे तसेच मेंदूचे आरोग्य सुधारते. रडताना अश्रू बाहेर येतात तेव्हा डोळ्यांच्या आत बसलेले अनेक बॅक्टेरिया बाहेर पडतात. अश्रू डोळ्यांमध्ये लपलेले अनेक प्रकारचे जंतू काढून टाकतात, त्यामुळे डोळे सतेज होतात. मात्र सतत रडत राहिल्याने याउलट घडू शकते. ते म्हणजे मनावर आणि मेंदूवर त्याचा परिणाम होऊन जीवन निरस वाटू लागते. म्हणून अति रडणे आणि अति हसणेही वाईटच!
आत्मविश्वास वाढतो मनावरचा अतिरिक्त ताण घालवण्यासाठी रडणे फायदेशीर ठरते. रडण्यामुळे भीती निघून जाते, आत्मविश्वास दुणावतो आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मन सज्ज होते. मन तणावग्रस्त असताना रडल्याने मेंदूचा दाब दूर होतो आणि शरीरात ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे मूड बदलतो आणि मानसिक दबाव आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
रडण्याचे कारण वेगवेगळे जगविख्यात टेनिस प्लेअर रॉजर फेडरर निवृत्तीच्या दिवशी मन मोकळेपणाने रडला. त्या रडण्यामागे बऱ्याच भावना दडलेल्या होत्या. निवृत्तीचे दुःख, आजवर कमावलेले नाव, यश, प्रसिद्धी आणि खेळाच्या आठवणी, टेनिस खेळावरचे प्रेम, लोकांचा प्रतिसाद आणि प्रतिस्पर्धी राफेल नदाल याचीही उत्स्फूर्त दाद, या सगळ्याच गोष्टींमुळे भारावलेला फेडरर भावविवश होऊन जगासमोर रडला होता. त्यालापाहून लोकांनाही अश्रू अनावर झाले. मात्र हे रडणे भावनिक असून यात भावनिक बंध होता. त्यामुळे रडण्याचे कारण वेगवेगळे असले तरी मनावरचे मळभ दूर होणे हेच त्याचे फलित असते.