Health Tips: आता कोलेस्ट्रॉलची काळजी नको; करा 'हे' पाच सोपे घरगुती उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 07:00 AM 2024-01-10T07:00:00+5:30 2024-01-10T07:00:02+5:30
Health Care: वयोगट कोणताही असो, पण वाढते कोलेस्ट्रॉल ही दिवसेंदिवस मोठी अनारोग्याची समस्या बनत आहे. रक्तामध्ये आढळणारा हा मेणासारखा पदार्थ रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने देखील कोलेस्ट्रॉल जमा होते आणि त्याचा विपरीत परिणाम रक्तनलिका तसेच यकृतावर थर साचून अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तो थर कमी करणे,घटवणे महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे कमी वयातही हृदयविकार, पक्षाघात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येणे इत्यादी घातक समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉलमुळे मुख्य भीती असते ती म्हणजे हृदय विकाराची. अलीकडच्या काळात अनेक तरुण हृदय विकाराने दगावल्याचे आपण ऐकत आहोत. हा धोका टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करू शकता किंवा कमी करू शकता, जसे की मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवणे. तसेच उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, ज्यामुळे हा वाईट पदार्थ नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकते. पैकी आपल्या घरातच आढळतील असे घटक जाणून घेऊ.
धने / कोथिंबीर कोथिंबिरीमुळे कोलेस्ट्रॉल घटण्यास मदत होते आणि मूत्राद्वारे ते शरीराबाहेर टाकले जाते. तसेच रात्रभर धने भिजवलेले पाणी पिणेही शरीरासाठी हितकारक ठरते. त्यासाठी चमचाभर धने पुरेसे असतात. तज्ज्ञांच्या मते, धने लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून ओळखले जाते. त्याच्या नित्य सेवनामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि शरीरातील कचरा काढून टाकण्यास मदत करते. शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी ते मूत्रपिंडाला मदत करते.
लसूण लसूण हा आणखी एक उत्तम आयुर्वेदिक घटक आहे, जो वाईट कोलेस्टेरॉल दूर ठेवण्यास मदत करते. लसणाच्या दोन पाकळ्या रोज अंशपोटी चघळल्याने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. लसूण एक उत्कृष्ट अँटी-ऑक्सिडंट देखील आहे आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत.
तुळस कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर उपचार करण्यासाठी तुळशी ही एक अद्भुत आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तुळशीची पाने मूत्रपिंडाद्वारे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकू शकतात. दररोज 2-3 तुळशीची पाने चघळल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
गुग्गुळ गुग्गुळ ही लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक आहे जी उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या औषधी वनस्पतीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे सक्रिय अवरोधक म्हणून ओळखले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तुम्ही चार-पाच दाणे गुग्गुळाचे रोज सेवन घेऊ शकता.
अर्जुन अर्जुन ही आणखी एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी हृदयाशी संबंधित समस्या जसे की कोंदलेल्या शिरा मोकळ्या करणे, हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे इ. काम करते. अर्जुनाच्या झाडाची साल चूर्ण स्वरूपात सेवन करता येते. अर्जुन पावडरमध्ये कोलेस्टेरॉल विरघळण्याची आणि हार्ट ब्लॉकेज होण्यापासून रोखण्याची क्षमता आहे. पावडर सकाळी (नाश्त्यापूर्वी) कोमट पाण्यासोबत सेवन करता येते.