आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:13 AM2024-06-03T10:13:25+5:302024-06-03T10:27:36+5:30

जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते काही आजारांचं कारण असू शकतं.

पाणी प्यायल्याने शरीराचं अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं. यामुळेच नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तहान लागते. पुन्हा पुन्हा पाणी प्यावसं वाटतं.

सतत गरम होतं असल्याने, घाम येत असल्याने शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते काही आजारांचं कारण असू शकतं.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तहान भागवण्यासाठी अनेक ग्लास पाणी पितात. थंड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक आणि सतत पाणी पिऊनही त्यांना घशाला कोरड पडल्याचं जाणवतं. या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाऊ नये, कारण ते धोकादायक असू शकतं.

डिहायड्रेशन हे देखील तहान लागण्याचं एक कारण असू शकतं. जेव्हा शरीरात आधीपासून पाणी खूप कमी असते तेव्हा फक्त एक किंवा दोन ग्लास नाही तर जास्त पाणी पिण्याची गरज असते.

डायबेटीस हे एकच नाही तर अनेक आजारांचं मूळ आहे. या आजारात खूप तहान लागते. तुम्हालाही खूप तहान लागली असेल तर ताबडतोब सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ड्राय माऊथमुळे जास्त तहान देखील लागते. वास्तविक, जेव्हा तोंडात लाळ योग्य प्रकारे तयार होत नाही, तेव्हा तोंड पुन्हा पुन्हा कोरडे होऊ लागते. त्यामुळे जास्त तहान लागते.

जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा त्याला एनीमिया म्हणतात. त्यात हिमोग्लोबिनची कमतरता असते. यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. पाणी प्यायल्यावरही घशाला कोरड पडल्यासारखे वाटू लागतं.

जर तुम्ही बाहेरचं जास्त खात असाल, जंक फूड किंवा खूप मसालेदार पदार्थ खात असाल तर तुमचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा होऊ शकतो आणि वेळोवेळी तहान लागते. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.