Health Tips:आजी आजोबांनी वाढत्या वयात अशी घ्यावी आरोग्याची काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स! By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 07:00 AM 2023-08-26T07:00:00+5:30 2023-08-26T07:00:03+5:30
Health Tips: वयोमानानुसार शरीर साथ देत नाही हे खरंच आहे. परंतु, जर शरीराला हव्या त्या पोषक गोष्टी मिळाल्या तर शरीर चांगली सोबत करेल. परंतु, त्यासाठी वृद्धापकाळात वृद्ध व्यक्तींंनी काही गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे. रोजच्या जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते, याबाबत अधिक माहिती देत आहेत डॉ. अमित भोपकर. वय वाढत जाते तसे शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. तारुण्यात वाटणारा उत्साह वृद्धापकाळात नाहीसा होऊन शरीराला जडलेल्या आजारपणाने निरुत्साही वाटायला लागते. थकवा, अशक्तपणा, एकटेपणा जाणवू लागतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन छोटे-मोठे आजार सतत त्रास देत राहतात. रोजच्या जीवनशैलीत पुढील महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते. शरीराची भूक भागली की मानसिक स्वास्थ्य अबाधित राहायला मदत होईल.
हलके अन्न घ्यावे : या वयात पचनसंस्था विस्कळीत झालेली असते. पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, अवेळी, चार चौघात गॅसेसच्या त्रासाने लाजिरवाणी अवस्था होणे. अशा समस्या दूर करण्यासाठी पचायला हलका आहार घ्यावा. तेलकट, मसालेदार, बेकरी पदार्थ टाळावेत. पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश करावा.
संतुलित आहार : पालेभाज्या, फळे, दूध, दही, ताक, अंडी, मांसाहार, मोड आलेली कडधान्ये असा परिपूर्ण संतुलित आहार घ्यावा. संतुलित आहारामुळे आवश्यक ती सगळी पोषक तत्त्वे शरीरास मिळतात आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
पाणी भरपूर पिणे : पचनासंबंधित विकारांवर रामबाण उपाय म्हणजे योग्य मात्रेत, योग्य वेळी पाणी पिणे. मलावष्टंभ, अजीर्ण, अरुची, अपचन, गॅसेस या सगळ्यांसोबत मूळव्याध उद्भवतो. वारंवार उन्हाळी लागणे, पोट दुखणे, लघवी साफ न होणे या समस्या उद्भवतात. या सगळ्या आजारांवर पाणी उत्तम औषध आहे.
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, बी 12 : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी, स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हे त्रास सुरू होतात. अंडी, मांसाहार, दूध आणि संतुलित आहारातून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, प्रोटिन्स शरीरास मिळतात. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 वा बी 12 च्या गोळ्या घ्याव्यात.
लोह : भूक लागत नाही, अरूची निर्माण होते. दिवस दिवस जेवणाची इच्छा होत नाही. सणासुदीचा किंवा आठवड्यातला एखादा वार अशा प्रकारचे उपवास करणे. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. म्हणून सतत थकवा, निरुत्साही, अशक्त वाटणे, चक्कर येणे, उगाचच चिडचिड होणे अशी लक्षणे दिसू लागतात. लोहाचे शरीरातले प्रमाण वाढण्यासाठी गाजर, सफरचंद, केळी, पालक, भेंडी, बीट, दूध, अंडी, मासे, गुळशेंगदाणे लाडू, डिंक लाडू, काळे मनुका, खजूर अशा पदार्थांचे सेवन करावे. वृद्धापकाळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तवाढीच्या गोळ्या वा भूक वाढीचे औषध घ्यावे.
फायबरयुक्त पदार्थ खावेत : हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे खावीत. फायबरयुक्त आहारामुळे पचनविकार दूर होऊन वजन नियंत्रित राहायला मदत होते. रोज अर्धा किंवा एक तास चाला. योगा, प्राणायाम करा. ताणतणावापासून दूर राहा.
आनंदी राहायचा प्रयत्न करा. छान, आवडीची पुस्तके वाचा. छंद जोपासा. आपला वेळ आवडत्या गोष्टींमध्ये घालवा. नवीन मित्र जोडा. जुन्या मित्रांसोबत बोला. लहान मुलांसोबत वेळ घालवा. यामुळे मन गुंतून राहते आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.