Health Tips: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासारखे चाळिशीतही फिट दिसायचे असेल तर फॉलो करा पाच टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:03 PM2023-09-09T18:03:10+5:302023-09-09T18:13:13+5:30

Health Tips: Healthy Diet: ब्रिटनचे पंतप्रधान आणि भारताचे जावई ऋषी सुनक जी-२० परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेली त्यांची गळाभेट आणि हिंदुत्त्वाबद्दल त्यांनी केलेले विधान सध्या चर्चेचा विषय असला तरी, त्याचबरोबरीने त्यांच्या फिटनेसबद्दल सर्व स्तरातून कौतुक होते हे नक्की! वयाच्या ४३ व्या वर्षीसुद्धा ते रुबाबदार दिसत आहेत. तुम्हीदेखील तुमच्या चाळिशीनंतर असाच फिटनेस ठेवण्याच्या विचारात असाल तर या खास टिप्स तुमच्यासाठी!

फिटनेस राखण्यासाठी योग्य आहार पद्धती महत्त्वाची आहे. वाढत्या वयानुसार आहारात बदल करणे अपरिहार्य असते. कारण वय वाढते तशी पचनशक्ती कमकुवत होत जाते. म्हणून विशेषतः चाळीशी ओलांडल्यावर आहारात पथ्य पाण्याचा समावेश केलाच पाहिजे आणि साठी ओलांडल्यावर एकभुक्त राहण्याचा सराव केला पाहिजे, तरच विविध प्रकारच्या आजारांपासून आपण दूर राहू शकू. याबरोबरच महत्त्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा.

आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनले आहे. म्हणून 'पिंडी ते ब्रह्माण्डी' असे म्हणतात. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू या पंचतत्वांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. म्हणजे कसा? ते जाणून घेऊ.

पृथ्वी : आयुर्वेद शाकाहाराचा पुरस्कार करते. आपल्या शरीराची चयापचय शक्ती पाहता त्याला मांसाहार झेपणारा नाही. असे असले तरी शाकाहारात सर्व प्रकारचे अन्न समाविष्ट असले पाहिजे. फळभाज्या, पालेभाज्या, धान्य, कडधान्य, फळं यांचे प्रमाणात सेवन करणे केव्हाही चांगले.

जल : पाणी पिण्याची आठवण व्हावी म्हणून हल्ली लोक अलार्म सेट करू लागले आहेत. अर्थात आपल्या शरीराला पाण्याची गरज असूनसुद्धा पाणी पिण्याची तहान लागत नाही. कारण शरीरातील पाणी उत्सर्जित होत नाही. घाम निघून विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडली, तरच स्वच्छ, शुद्ध पाण्याद्वारे शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहील.

अग्नी : भूक लागल्याशिवाय खाणे शरीराला मारक ठरते. भूक उद्दीपित होईपर्यंत खाऊ नका. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या. फळांचे सेवन करा. त्यामुळे जठराग्नी उत्पन्न होईल आणि खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर मेदात न होता ऊर्जेत होईल.

आकाश : दिवसातून १६ तास उपास करा. त्यामुळे आकाशात जशी पोकळी निर्माण होते, तशी पोकळी पोटात निर्माण होऊन चयापचय क्रिया सुधारायला मदत होईल. रात्री ७ नंतर जेवण टाळा आणि दुसऱ्या दिवशी १० वाजता नाश्ता करा. आठवड्यातून एक दिवस पूर्ण लंघन करा. काहीही न खाता उपास करा. तुम्हाला हलके वाटू लागेल. शारीरिक तक्रारी उद्भवणार नाहीत.

वायू : योगाभ्यासाद्वारे स्वछ, शुद्ध हवा शरीरात जाऊ द्या. तरच शरीरातील दूषित हवा उत्सर्जित होऊ शके. शरीर यंत्रणा नियमित चालण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात वायू पुरवठा झाला पाहिजे आणि तो योगाभ्यासाने किंवा प्रभात फेरी मुळे मिळू शकेल.