Health Tips:पावसाळ्यात सूर्यास्ताआधी जेवणेच सोयीस्कर; तब्येत राहील फिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:59 PM2023-07-21T17:59:36+5:302023-07-21T18:02:36+5:30

Health care: आपल्या बालपणी श्रावणी सोमवारी आपण न चुकता लवकर जेवत असू. पण हा संस्कार केवळ सणांपुरता मर्यादित नव्हता, तर आपल्या पूर्वजांची ती जीवनपद्धतीच होती. आज त्यालाच डाएट असे गोंडस नाव आहे. त्यात मतमतांतरे दिसून आली तरी 'या' एका बाबतीत एकमत दिसून येते.

अलीकडच्या डाएट बाबतीत एवढा संभ्रम निर्माण झाला आहे, की कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही अशी परिस्थिती आली आहे. तरीदेखील एका बाबतीत सर्व आहार तज्ज्ञांचे एकमत होते, ते म्हणजे सूर्यास्ताआधी जेवणे. या गोष्टीला धर्म शास्त्राने देखील दुजोरा दिला आहे. एवढेच नाही, तर पूर्वीच्या काळी या गोष्टीचे कटाक्षाने पालन केले जात असे. एवढेच काय, तर निसर्गात डोकावले तर पशु पक्षी देखील सूर्यास्तानंतर खात पित नाही. याचा अर्थ हा नियम निसर्गाला अनुसरून आहे का? यामागे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊया...

पहिले कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते. या काळात अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो. याउलट उशिरा जेवल्याने आणि लगेच झोपल्याने अन्न पचत नाही आणि त्याचे रूपांत ऊर्जेत न होता मेद वृद्धीत होते.

दुसरे कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे ते पचत नाही आणि विविध रोग शरीरात घर करतात. रात्री झोप पूर्ण होते. सकाळी वेळेत पोट साफ होते. दिवसभर थकवा जाणवत नाही.

तिसरे कारण : सूर्यास्तानंतर सूर्य प्रकाशाअभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात. वातावरणात आलेले जडत्त्व आपल्या शरीरालाही जाणवते, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जेवतो आणि रोगांना आमंत्रण देतो.

चौथे कारण : सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशु पक्षी देखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू. म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते.