सिद्धार्थ शुक्लासारखी अकाली एक्झिट नको असेल तर आत्ताच ओळखा हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:07 PM 2021-09-03T12:07:08+5:30 2021-09-03T12:57:00+5:30
अभिनेता आणि बिग बॉस १३ विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या ४० वर्षाच्या सिद्धार्थची ही एक्झिट मनोरंजन क्षेत्रातीलच नाही तर सामान्य नागरिकांच्याही मनाला चटका लावून गेली. याचपार्श्वभूमीवर, सिद्धार्थच्या मृत्यूने पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकारांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हल्लीच्या तरुणांप्रमाणेच सिद्धार्थही फिटनेसच्या बाबतीत जागृक होता. मित्रांमध्ये फिटनेसवर तो भरभरून बोलायचा. शिवाय तो खाण्यापिण्याच्या बाबतीतही सर्तक असायचा. त्याच्या त्याच फिट बॉडी बिल्डिंगवर तरुणी घायाळ व्हायच्या. तर अनेक तरुण त्याच्या फिटनेसला फॉलोही करायचे. पण असे असतानाही त्याचा अवघ्या ४० व्या वर्षी हृद्यविकाराने मृत्यू झाला.
विशेष म्हणजे हृदयविकाराशी संबंधित कुठलीही तक्रार नसणाऱ्यांना देखील हृदयविकाराचा झटका आल्याचे व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. यात अनेक तरुण सेलिब्रिटीजबरोबर सामान्य तरुणही आहेत. यामागची नेमकी कारणं जाणून घेणं महत्वाचे आहे.
धूम्रपान किंवा मद्यपान करणं हे आजच्या तरुण तरुणींच्या लाईफस्टाईलचा एक भाग आहे. वेळीअवेळी जेवणं, कमी झोप, मिळेल ते खाणं यामुळे तरुणांमध्ये हृद्याशी संबंधित विकार वाढत आहेत.
हल्लीच्या मुलांना झटपट मिळणारं चटपटीत जंक फूड खाण्याचं व्यसनचं लागल आहे. पण जीभेचे चोचले पुरवणाऱ्या या जंक फूडच्या सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. कॅलरीज वाढल्याने कॉलेस्ट्रॉल वाढते. ज्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी संबंधित व्याधी बळावतात.
हृद्यविकार जडण्याच्या अनेक कारणांपैकी कामाचा ताण हे देखील एक प्रमुख कारण आहे. मनावर ताण असेल तर साहजिकच त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो. यामुळे रक्तवाहीन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. परिणामी हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. यामुळे देखील हृदयावर ताण य़ेऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तरुणांमध्ये सध्या फिटनेसचे क्रेझ आहे. यासाठी अनेक तरुण तरुणी जिममध्ये तासनतास वर्कआऊट करतात. यामुळे अनेक जिममध्ये या तरुणांना या बर्न कॅलरिज डाएटमधून मिळवण्यासाठी सप्लिमेंट डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. मग यासाठी तरुण प्रोटीनची मात्रा अधिक असलेला डाएट फॉलो करतात. एम्बॉलिक स्टिरॉइड्स सारख्या उत्पादनांचा वापर करतात. याचा थेट परिणाम फक्त हृदयवरचं नाही तर किडनीवरही होतो.
भविष्याच्या चिंतेमुळे तरुण एवढे अस्वस्थ होतात की ते पूर्णतः जगणंच विसरून जातात. काही गोष्टी मिळवण्याच्या नादात ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे झोपणे तसंच सकाळी उठण्याच्या वेळेवरही परिणाम होतो. याच कारणामुळे तणाव वाढत जातो. तणावामुळे हार्ट फॅल्युअर होण्याचा धोका अधिक असतो.
आपल्या हृदयावर सतत उच्च रक्तदाबाचा ताण असेल तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदय निकामी होऊ शकते. याला इंग्रजीमध्ये ‘हार्ट फेल्युअर’ असे म्हणतात. सतत उच्च रक्तदाब जास्त असेल, तर हृदयाच्या रक्तवाहिन्यासुद्धा निकामी होतात आणि असे झाले, की आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
हृदयविकाराचा झटका येण्याची अशी निश्चित वेळ नाही. एखादी व्यक्ती कधीही या रोगाच्या कचाट्यात येऊ शकते. असे असूनही, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वी, अशी अनेक लक्षणे आहेत जी त्या व्यक्तीला सतर्क करतात की, आपण हृदयविकाराचा बळी होऊ शकता. अत्यंत थकवा, निद्रानाश, श्वास घेण्यात अडचण, छातीत अस्वस्थता, आंबट ढेकर, हृदयाचा अनियमित ठोका आणि पाय-घोट्यांना सूज येणे ही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत.
व्यायाम किंवा योगा केल्याने तुम्ही स्वतःला हृदयाशी संबंधित सर्व आजारांपासून वाचवू शकता, आणि तुमच्या पुढच्या पिढीबद्दलही खात्री बाळगू शकता. आहारात भरपूर फळे आणि भाज्या घ्या. तळलेले किंवा जंक फूडपासून कायमचे दूर रहा. वेळेवर अन्न घ्या आणि वेळेवर पूर्ण झोप घ्या. यासह 30-35 वर्षांनंतर दरवर्षी आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करत रहा.