दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' सर्वात स्वस्त औषधालाही मिळाली परवानगी By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:56 AM 2020-06-22T09:56:27+5:30 2020-06-22T10:11:31+5:30
कोरोनाचा विषाणूंमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ सातत्याने लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारत सरकारकडून अजून एका औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी मंजूरी देण्यात आली आहे.
औषधनिर्मीती करणारी कंपनी हेट्रोने दिलेल्या माहितीनुसार कोविड 19च्या उपचारांसाठी इनवेस्टिगेशनल एंटीवायरल ड्रग रेमडेसिवीरचा वापर केला जाणार आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. हे औषध भारतात Covifor या नावाने विक्री केले जाणार आहे.
हेट्रो ग्रुप ऑफ कंपनीज चे चेयरमन डॉ. पार्थ सारथी रेड्डी यांनी सांगितले की. भारतात या औषधाला मिळालेली परवागनी गेमचेंजर ठरू शकते. कारण वैद्यकिय परिक्षणात या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
DGCI ने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात भरती असलेले लहान मुलं आणि वयस्कर कोरोना रुग्ण यांच्या उपचारासाठी या औषधाचा वापर केला जाणार आहे.
रेड्डी यांनी सांगतले की, या औषधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. हे औषध १०० एमजीच्या इंजेक्शन स्वरुपात उपलब्ध असेल. या औषधाची किंमत १०३ रुपये असणार आहे.
भारत सरकारकडून कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला कोरोना रुग्णांची औषध तयार करण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सची औषधं देण्यात येणार आहे. या फेबीफ्लू या औषधाचे कोरोना रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असताना या औषधांना परवागनी मिळाली आहे. आधीच्या तुलनेत व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण आता वाढलं आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.
गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. तर सोशल डिस्टेंसिग आणि मास्कच्या वापराबाबत वारंवार माहिती देण्यात येत आहे.