Home Remedies for Mosquito Bites: डासांमुळे हैराण? 'हे' दहा घरगुती उपाय डासांचा करतील नायनाट; जरूर करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:11 AM2022-07-12T11:11:02+5:302022-07-12T11:17:48+5:30

Home Remedies for Mosquito Bites: पावसाळा आल्हाददायक वाटत असला तरी घोंगवणाऱ्या माशा आणि कडकडून चावा घेणारे डास सगळ्या रोमँटिक मूड चे बारा वाजवतात. त्यांच्यामुळे रोगराई प्रसरते ती वेगळीच. कॉईल लावावी तर त्याच्या धुराच्या त्रासाने आपल्याला श्वसनाचा त्रास उद्भवतो, मात्र डास सुखेनैव फिरत असतात. यावर १० घरगुती उपाय पुढे देत आहोत, ते जरूर करून बघा, तुमची डासांपासून सुटका होईल हे नक्की!

एखाद्या मांत्रिकाने दिलेला हा उपाय वाटेल. गमतीचा भाग सोडा, पण हा उपाय खरोखरच फायदेशीर ठरतो. तुम्हाला फक्त लिंबू अर्धे चिरून त्यावर लवंग खोवून मोक्याच्या ठिकाणी ते ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डास मारत बसण्याची गरज पडणार नाही. कारण डास, माशा तुमच्या घराकडे फिरकणार सुद्धा नाहीत.

लसणीचा दर्प आपल्याला सहन होत नाही तसा डासांनाही सहन होत नाही. आहे ना मजेशीर? हा स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला लसणीच्या पाकळ्या सोलून, चिरून काही तास पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत. त्यानंतर ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घराचे कोपरे, पडदे, चप्पल ठेवण्याची जागा इ ठिकाणी फवारायचा आहे.

लसणीचा वास सहन होत नसेल तर त्याला उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे निलगिरीच्या तेलाचा! हा स्प्रे बनवण्यासाठी निलगिरीची पाने पाण्यात उकळवून घ्या आणि ते पाणी गार झाल्यावर स्प्रे बॉटल मध्ये भरून घरात फवारणी करा. किंवा निलगिरीचे तेल शाम्पू आणि पाण्याच्या मिश्रणात टाकून त्या पाण्याची फवारणी घरात करा. घर सुगंधी होईल आणि डासही येणार नाहीत.

रात्रीची झोपमोड होऊ नये म्हणून मच्छरदाणीचा पर्याय उत्तम आहे. पावसाळी दिवसात माशा घोंगावत राहिल्या तरी त्या मच्छरदाणीत प्रवेश करू शकणार नाहीत. त्यांचे संगीत अर्थात भुणभुण बाहेर सुरु राहिली तरी आत तुम्ही सुखाने झोपू शकाल. याशिवाय बारीक जाळीची मच्छरदाणी सगळ्या खिडक्यांना लावून घेतलीत तरीसुद्धा डास, माशांना प्रतिबंध करता येईल.

घरोघरी असणारा स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे कापूर. कापराच्या सुगंधाने वातावरण शुद्धी होते आणि डास, माशा पळून जातात. घरात खूप डास, माशा असतील तर किमान २० मिनिटं तुम्हाला घरात कापूर जाळला पाहिजे. मात्र तसे करताना तुम्ही खोलीबाहेर राहून दारं-खिडक्या बंद करून घेतल्या पाहिजेत.

एका भांड्यात पाणी उकळून त्यात साखर घाला. ते पाणी गार झाल्यावर एका प्लास्टिक बॉटलमध्ये भरा. जेणेकरून डास, माशा पाण्याकडे आकृष्ट होती आणि त्या बॉटलमध्ये गेल्यावर त्या पाण्यात अडकून पडतील.

हा आपला अतिशय पारंपरिक उपाय आहे. शेण्या जाळून त्याचा धूर घरभर पसरून घ्या. शेणी जाळल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल तसेच सगळे जीव जंतू, डास, माशा घराबाहेर पळून जातील. शेणाने घर सारवणे आता शक्य नसले तरी शेणीचा वापर आपण सहज करू शकतो.

तिन्ही सांजेला दिवा लावून आपण लक्ष्मी मातेला घरी बोलवतो, त्याचवेळेस लावलेल्या धूप, दीपाच्या वासाने डास, माशा घराबाहेर जातात. अंधाऱ्या जागी त्यांचे प्राबल्य जास्त असते. म्हणून अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये मेणबत्ती, सुवासिक उदबत्ती किंवा सायंकाळी धूप लावून डासांना पळवून लावू शकता आणि घर सुगंधी ठेवू शकता.

डास असो वा माशा, त्यांना काही सुगंधी फुलांची ऍलर्जी असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तुळस, पुदिना, लव्हेंडर, रोझमेरी इ. रोपांमुळे डास घराकडे फिरकत नाहीत. अशी रोपं जाणीवपूर्वक घराच्या अशा भागात ठेवा जिथे डास, माशा जास्त प्रमाणात घोंगावतात. किंवा तसे शक्य नसेल तर तुळस, पुदिना यांची पाने, तसेच लव्हेंडरची पाने घातलेल्या पाण्याचा स्प्रे अशा जागी फवारल्यास डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.

घरात जिथे जिथे पाणी साठवून ठेवता, ते पाणी झाकलेले असेल याची पूर्णतः काळजी घ्या. कारण उघड्या पाण्यावर माशा, डास अंडी घालतात आणि त्यांची पैदास वाढते. शिवाय ते पाणी आपल्यासाठी अपायकारक ठरते. म्हणून पावसाळ्यात साठवलेले पाणी झाकण्याची मुख्य खबरदारी घेणे गरजेचे आहे!