अंडं व्हेज की नॉनव्हेज? अखेर शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलं; भन्नाट लॉजिक सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 07:32 PM 2022-04-25T19:32:20+5:30 2022-04-25T19:35:45+5:30
अंडं व्हेज की नॉनव्हेज?; संशोधनातून मिळालं उत्तर; शास्त्रज्ञांनी तर्क सांगितला अंडं व्हेज की नॉन व्हेज? या प्रश्नावरून अनेक ठिकाणी अनेकदा चर्चा झडतात. मांस, मासे खाताना जीवाची हत्या होते. तशी अंडं खाताना होत नाही, असा काहींचा दावा असतो. अशी मंडळी अंडं व्हेज असल्याचं सांगतात.
अंड्यांमधून जीव बाहेर पडणार असतो. त्यातून पिल्लू जन्माला येणार असतं. त्यामुळे अंडं हे मांसाहारीच, असा दावा काहींकडून केला जातो. या वर्गातील मंडळी अंडं नॉन व्हेज असल्याचा दावा करतात. त्यामुळे अंडं व्हेज की नॉन व्हेज असा प्रश्न अनेकांना पडतो.
अंडं कोंबडीपासून मिळतं. त्यामुळे ते नॉन व्हेज असा अनेकांचा दावा आहे. त्यावर मग दूधही प्राण्यांकडूनच येतं. मग ते शाकाहारी कसं असा सवाल शास्त्रज्ञांनी उपस्थित केला आहे.
अंड्यांमधून जीव बाहेर येणार असतो. त्यातून पिल्लू बाहेर पडणार असतं. त्यामुळे अंडं मांसाहारीच, असा दावा करणाऱ्यांना शास्त्रज्ञांनी उत्तर दिलं आहे. बाजारात मिळणारी अंडी अनफर्टिलाईज्ड असतात. त्यामुळे या अंड्यांमधून कधीच पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत, असं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
अंडं व्हेज की नॉन व्हेज या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. अंड्यात तीन थर असतात. पहिला थर कवच, दुसऱ्या थरात पांढरा भाग असतो. तर तिसरा थर बलक असतो. सफेद भागात केवळ प्रोटिन असतं. यामध्ये प्राण्याचा कोणताही भाग नसतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पांढरा भाग व्हेज असतो.
अंड्यातील पिवळ्या भागात म्हणजेच बलकामध्ये प्रोटिनसोबत कोलेस्ट्रॉल आणि फॅट असतं. कोंबडा आणि कोंबडीच्या संपर्कात आल्यावरच अंड्यात पिल्लू निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. अंड्यातील गॅमेट सेल्समुळे ते मांसाहारी होतं. मात्र बाजारात असलेल्या अंड्यांमध्ये तसं काहीच नसतं.
कोंबडी ६ महिन्यांची झाल्यानंतर अंडी देऊ लागते. ती एक किंवा दीड दिवसानं अंडी देते. बाजारात उपलब्ध असलेली अंडी अनफर्टिलाईज्ड असतात. त्यातून कधीही पिल्लं जन्माला येऊ शकत नाहीत. त्यामुळे बाजारात असलेली अंडी शाकाहारीच असतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.