नाका-तोंडातून उग्र दर्प येतोय? या व्हिटॅमिनची असू शकते कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:20 IST2025-02-03T13:55:56+5:302025-02-03T14:20:14+5:30

विशेषतः तरुणांमध्ये दात-हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मुख दुर्गंधी आणि श्वास दुर्गधी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. केवळ मौखिक स्वच्छता राखून प्रश्न सुटत नाही.

सुदृढ शरीरासाठी आवश्यक असलेल्या 'व्हिटॅमिन बी १२'ची कमतरता अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण देते. विशेषतः तरुणांमध्ये दात-हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मुख दुर्गंधी आणि श्वास दुर्गधी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. केवळ मौखिक स्वच्छता राखून प्रश्न सुटत नाही.

तर 'व्हिटॅमिन बी १२' ची पातळीही योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. यासोबतच 'व्हिटॅमिन बी १२' च्या कमतरतेमुळे हातपाय थरथर कापणे, तोंड येणे, पोटाचे विकार, आतड्याला सूज, अशक्तपणा, नसांची कमजोरी, चक्कर येणे, थकवा जाणवणे यासारख्या समस्याही जाणवतात.

'व्हिटॅमिन बी १२' हे आपल्या शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व असून, ते तयार केले जाऊ शकत नाही. ते नैसर्गिकरीत्या आढळते. हे पाण्यात विरघळणारे ब जीवनसत्त्व गटातील आठवे जीवनसत्त्व आहे.

सतत तोंड येत असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, मुख दुर्गंधी असेल तर व्हिटॅमिन बी १२ ची चाचणी करून घ्यावी. मुख दुर्गंधी, श्वास दुर्गंधी मौखिक आरोग्य चांगले नसल्याचे द्योतक आहे. खाल्लेले अन्न कण जीभ अथवा दातांभोवती साचून राहिले तर ते कुजतात आणि मुख दुर्गंधी वाढते.

हिरड्या कमकुवत असतील, दुखत असतील किंवा सूज आली असेल, तर जीवनसत्त्व ए, बी १२, सी आणि डी या पोषकतत्त्वांची कमतरता आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात या समस्या दभवतात. आहारात बदल करून ही जीवनसत्त्वे मिळवू शकतात. मौखिक पेशी मजबूत झाल्यास हिरड्यांचं आरोग्य सुधारते, दात मजबूत राहतात. केस आणि त्वचा चांगली राहतेच, शिवाय बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्याचे काम करते.

सतत थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर तो व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा इशारा असू शकतो. शरीरातील ऊर्जेचे उत्पादन कमी झाल्याने दिवसभर थकल्यासारखे वाटते. रक्तातील हिमोग्लेबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. आजारी नसताना देखील अशक्तपणा जाणवतो.

दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, खेकडा, डाळी, पालेभाज्या, मशरूम या पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन बी १२ ची पातळी नियमित तपासणी करावी. दातांसह शरीराला सूर्यकिरणे मिळणेही महत्त्वाचे आहे, त्यामुळे रोज सकाळी २० मिनिटे सूर्यप्रकाशात घालवणे आवश्यक आहे.

'व्हिटॅमिन बी १२' च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, हातापायाला थरकाप होणे, मुख दुर्गंधी यांसह विविध शारीरिक समस्या जाणवतात. 'व्हिटॅमिन बी १२' ची कमतरता योग्य आहारातून भरून काढता येऊ शकते. प्रसंगी औषधोपचाराचीही गरज भासू शकते. यामुळे तीव्र समस्या जाणवल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. सीमा जोशी यांनी सांगितले आहे.