World thyroid day 2022: ‘या’ सात लक्षणांकडे कधीही करू नका दुर्लक्ष, असू शकतात थायरॉईडचे संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:29 AM 2022-05-25T09:29:06+5:30 2022-05-25T09:40:25+5:30
World thyroid day 2022: २५ मे दरवर्षी जगभरात जागतिक थायरॉईड दिवस (World thyroid day 2022) म्हणून साजरा केला जातो. लोकांना याबाबत सतर्क करणं हे यामागील उद्देश आहे. World thyroid day 2022 - जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना थायरॉईडबाबत सतर्क करणं हे आहे. थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या काम करू शकत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. विशेषत: ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी घशाच्या पुढील भागात असते. हे हार्मोन बनवते, ज्याच्या मदतीने मेटाबॉलिजम नियंत्रणात राहते. जेव्हा हार्मोन्सची पातळी खूप कमी किंवा खूप जास्त होते, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात.
वजनात बदल हे थायरॉईड विकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. वजन वाढणे हे थायरॉईड हार्मोन कमी होण्याचे संकेत देतात, त्याला हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) म्हणतात. दुसरीकडे, थायरॉईडमुळे शरीरात जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होतात, तर वजन खूप कमी होऊ लागते. याला हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) म्हणतात. हायपोथायरॉईडीझम बहुतेक लोकांमध्ये आढळतो.
मानेला सूज येणे हेदेखील थायरॉईड विकाराचे लक्षण आहे. यामध्ये गळ्यात गॉयटर तयार होते. हे हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम दोन्हीमध्ये होऊ शकते. कधी कधी मानेवर सूज येणे हे थायरॉईड कर्करोग किंवा गाठीमुळेदेखील होण्याची शक्यता असते.
थायरॉईड हार्मोन शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर परिणाम करतात. त्यामुळे हृदयाचे ठोकेही बदलू लागतात. हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांच्या हृदय गती सामान्यापेक्षा कमी असते, तर हायपरथायरॉईडीझम असलेल्या लोकांचे हृदयाची गती वेगवान असते. त्यामुळे रक्तदाबही वाढतो.
थायरॉईड डिसऑर्डरचा एनर्जी लेव्हल आणि मूडवर देखील मोठा परिणाम होतो. हायपोथायरॉईडीझम असलेले लोक थकलेले, सुस्त आणि उदास दिसून येतात. तर हायपरथायरॉईडीझममुळे चिंता, झोपेचा त्रास, अस्वस्थता आणि चिडचिड होते.
केस गळणे हे थायरॉईड हार्मोन असंतुलीत असल्याचे आणखी एक लक्षण आहे. ही समस्या हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम दोन्हीमध्ये जाणवू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, थायरॉईड विकारावर उपचार केल्यानंतर केस पुन्हा वाढतात.
थायरॉईड डिसऑर्डरमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांना नेहमीपेक्षा जास्त थंडी जाणवते. तर हायपरथायरॉईडीझम असलेल्या लोकांना खूप घाम येतो.
हायपोथायरॉईडीझममध्ये कोरडी त्वचा आणि तुटलेली नखे, हात आणि पाय सुन्न होणे, अनियमित मासिक पाळी यांसारखी इतर लक्षणे देखील जाणवू शकतात. त्याच वेळी, हायपरथायरॉईडीझमची असामान्य लक्षणे म्हणजे स्नायू कमकुवत होणे किंवा हात थरथरणे, डोळ्यांच्या समस्या, अतिसार, अनियमित मासिक पाळी ही आहेत.