Oxygen Cylinder: कोरोना रुग्णांसाठी घरात ऑक्सिजन सिलेंडर ठेऊ शकतो? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:46 AM 2021-04-16T10:46:01+5:30 2021-04-16T10:49:30+5:30
Oxygen Cylinder for Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहेत. अशातच ऑक्सिजन बेडचा अभाव असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संक्रमणामुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काहींना आयसीयू सुविधा घरीच दिल्या जात आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहेत.
ज्याप्रकारे आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी सिलेंडर घरी अथवा कारमध्ये ठेवले जातात. तसेच कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जाऊ शकतो असं तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणं आहे.
आपत्कालीन स्थितीत कोरोना रुग्णासाठी घरी ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर फायदेशीर ठरेल. अचानक ऑक्सिजन पातळी खालावली तर हॉस्पिटलला पोहचेपर्यंत वेळ जाऊ शकतो. परंतु घरात ऑक्सिजन सिलेंडर ठेवला तरी रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावं. गरजेशिवाय ऑक्सिजन सिलेंडरचा प्रयोग करू नये असं डॉ. एन के गुप्ता सांगतात.
घरात ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाला कसा लावायचा याची माहिती असणं गरजेचे आहे. शरीरात ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यानंतर तात्काळ घरी असलेला ऑक्सिजन मिळाला तर कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
सिलेंडरऐवजी ऑक्सिजन कंसट्रेटर मशीनही फायदेशीर ठरते. ही घरात ठेवणंही सोप्प असतं. ही मशीन वातावरणातून ऑक्सिजन घेऊन रुग्णाला ऑक्सिजन उपलब्धता करते. परंतु त्याची किंमत जास्त असते. जवळपास ४० ते ५० हजार रुपयात ते मिळतं.
श्वास घेण्यास अडचण येत असेल तर ऑक्सिजनची आवश्यकता भासते. अशात घरी पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर ठेवला जाऊ शकतो. या सिलेंडरसोबत मास्कही येते. किंवा मास्क वेगळंही खरेदी केलं जाऊ शकतं. रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यावर पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरने त्याचा जीव वाचू शकतो. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर ते लावून रुग्णाला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो.
हे सिलेंडर बाजारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ७५ लीटर सिलेंडरची किंमत ५ हजारापर्यंत आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन कंप्रेस केलं जातं. ज्यामुळे ते छोट्या बॉटेलमध्ये उपलब्ध होते. याचं वजन फक्त ७०० ग्रॅम इतकं असतं.
पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या एका व्यावसायिकाचं म्हणणं आहे की, सध्या बाजारतही ऑक्सिजन सिलेंडर कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे गरजेनुसार त्याचा पुरवठा करणं कठीण होत आहे.
देशात कोरोनाचे वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्राने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने गुरुवारी याची महिती दिली.
सरकारनं सांगितलं की, कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी परदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयातच्या माध्यमातून केंद्र सरकार ही प्रक्रिया पार पाडणार आहे. या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.