जास्त उशीर होण्याआधी जाणून घ्या 'ही' फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं, टळेल गंभीर धोका By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:25 PM 2021-08-09T12:25:40+5:30 2021-08-09T13:17:36+5:30
कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर फुफ्फुसं निरोगी असणे खुप गरजेचे आहे. फुफ्फुसांना इतर समस्यांही होऊ शकतात. यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुमची फुफ्फुसं खराब झाली असल्यास काही लक्षणं दिसून येतात, ती वेळीच ओळखली तर योग्य तो उपचार करता येतो... खरं तर खोकणे म्हणजे कफिंग ही आपल्या शरीराद्वारे केली जाणारी एक संरक्षक क्रिया आहे. हवेच्या मार्गातून म्यूकस म्हणजे बलगम दूर करणे, विषारी द्रव्य अथवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली गेली तर ती बाहेर फेकणे अशी कामं ह्यामुळं होतात. मात्र सततचा किंवा वाढता खोकला, ताप चढणे, धाप लागणे किंवा कफातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वसामान्य लक्षण म्हणजे खोकला.
श्वास घेताना धाप लागणे हे श्वसनसंस्थेचे विकार, दृदयरोग, चिंता ह्यांवरदेखील अवलंबून असू शकते. इतर लक्षणांसोबत सतत धाप लागणे हे रोगाचं चिन्ह असू शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांना दाखवा.
हातापायांवर, विशेषतः पायाच्या घोट्यावर सूज दिसल्यास हे फुफ्फुसांच्या आजाराचं लक्षण असू शकते. ह्याचा संबंध सामान्यतः हृदयविकाराशीदेखील असू शकतो आणि त्याबरोबरीनं धाप लागू शकते. बरेचदा, अनेक आजारांचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर एकदमच होत असल्यानं, सारखीच लक्षणे दिसू शकतात.
फुफ्फुसं, फुफ्फुसावरणाची जळजळ किंवा छातीच्या पिंजर्यामधील स्नायू तसंच हाडांच्या समस्यांमुळे छातीत दुखू शकते. हे दुखणे किरकोळही असू शकते तसंच गंभीरही - कधीकधी जिवावर बेतणारं देखील. छातीत सतत दुखू शकते किंवा फक्त श्वास घेताना. खोकला किंवा ताप येऊन छातीत दुखत असेल तर मात्र जंतुसंसर्गाची शक्यता असू शकते. छातीत दुखत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.
रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण पुरेसं नसले तर अशा व्यक्तीची त्वचा निळसर-जांभळ्या रंगाची दिसते, विशेषतः ओठांभोवती आणि नखांच्या मुळाशी. फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळं सायनोसिस अचानक उद्भवू शकतो किंवा फुफ्फुसांची स्थिती वर्षानुवर्षं बिघडत गेल्यास सायनोसिसचीही लक्षणे दिसत राहतात.
श्वास घेताना किंवा सोडताना शिट्टीसारखा आवाज येऊ शकतो. ह्याचं कारण म्हणजे श्वसनमार्ग अरुंद बनणे, बलगमचं वाढलेले प्रमाण किंवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली जाणे. ह्या लक्षणानं फुफ्फुसांची एकंदर ढासळती स्थितीदेखील समजते.
तुम्हाला जिने चढल्यामुळे, बराचवेळ काम केल्याने अथवा गेम खेळल्याने थकवा आल्यासारखे वाटत असेल तर हे फुफ्फुसांच्या कमजोरीचे लक्षणं असू शकते. आपल्या पेशी तेव्हाच उत्तम प्रकारे काम करतात जेव्हा त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. फफ्फुसांचे कार्य जर व्यवस्थित सुरु नसेल तर हा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीराराला मिळत नाही आणि थकवा वाटतो.
तुमच्या शरीरात एखादा अवयव व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. तुमची फुफ्फुसे जर योग्य रितिने कार्यरत नसतील तर तुम्हाला इंफ्लेमेशनची समस्या जाणवू शकते ज्यामुळे वजन घटते.
खोकताना रक्त पडणे. हे रक्त शुद्ध स्वरूपात थेट पडू शकते किंवा कफ लालसर-गुलाबी रंगाचा असू शकतो. ही समस्या सततच्या खोकण्यामुळं उद्भवू शकते पण अशावेळी फुफ्फुसांचा काही गंभीर आजार आढळण्याची शक्यता जास्त असते.
धूम्रपानामुळं आपल्या शरीरावर भयानक परिणाम होतात. सिगरेट किंवा बिडी ओढल्यानं फक्त फुफ्फुसांचे आजारच होतात असं नाही तर एंफिसेमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यचीही शक्यता असते. शरीराच्या इतर अनेक अवयवांवर आणि त्यांच्या कामावरदेखील धूम्रपानाचे वाईट परिणाम होतात.